India vs England : क्वारंटाईन कालावधी संपला अन् टीम इंडियाचे शिलेदार मैदानावर सरावासाठी उतरले, See pics

तीनही कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी सोमवारपासून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सरावाला सुरुवात केली. ५ फेब्रुवारीला दोन्ही संघांमध्ये मालिकेतील पहिला सामना सुरू होणार आहे.

क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून सोमवारी टीम इंडियाचे सर्व शिलेदार मैदानावर सरावासाठी उतरले. ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटीनंतर रजेवर गेलेला कर्णधार विराट कोहलीचे ( Virat Kohli) पुनरागमन होत असल्यानं चाहते आनंदात आहेत.

कोरोना व्हायरसच्या संकटानंतर टीम इंडिया प्रथमच मायदेशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका खेळणार आहे, त्यामुळे सर्वांना या मालिकेची उत्सुकता आहे.

२०२०च्या सुरूवातीला ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर आली होती आणि तीन सामन्यांची वन डे मालिका टीम इंडियानं २-१नं जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आणि त्यानंतरची मायदेशातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका रद्द करावी लागली होती.

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून मायदेशात परतले आहेत, तर इंग्लंडनेही श्रीलंकेला त्यांच्याच घरी २-० असे पराभूत केले आहे. त्यामुळे दोन्ही संघ सकारात्मकतेनं एकमेकांचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत.

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईत होतील आणि दुसऱ्या सामन्यात ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियमवर उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. उर्वरित दोन सामने अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर होतील.

भारत - रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, रिषभ पंत, वृद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर; नेट बॉलर : अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वारियर, के. गौतम आणि सौरभ कुमार; राखीव खेळाडू : के. एस. भरत (यष्टीरक्षक), शाहबाज नदीम, राहुल चाहर आणि अभिमन्यू ईश्वरन.