India vs Australia, 3rd Test : वेदना होत असतानाही रिषभ पंत ऑसींना भिडला, एकाही आशियाई यष्टिरक्षकाला न जमलेला पराक्रम केला!

India vs Australia, 3rd Test Day 5 : ऑस्ट्रेलियाच्या ४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या पाचव्या दिवसाची सुरुवात काही चांगली झाली नाही. कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर माघारी परतला.

टीम इंडियासाठी हा मोठा धक्काचा होता, पण फलंदाजीच्या क्रमवारीत बढती मिळालेल्या रिषभ पंतनं ( Rishabh Pant) सामन्याचे चित्र बदललं. त्यानं आक्रमक खेळ करताना टीम इंडियाला पहिल्या सत्रात १०८ धावा करून दिल्या. पहिल्या डावात दुखापत झाल्यानंतर रिषभ क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आला नव्हता. पण, वेदना होत असतानाही तो मैदानावर उतरला.

२ बाद ९८ धावांवरून पाचव्या दिवसाची सुरुवात करताना टीम इंडियासमोर ३०९ धावा बनवा किंवा सामना अनिर्णीत राखण्यासाठी प्रयत्न करा, हे दोनच पर्याय आहेत. त्यामुळे अजिंक्य व चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांचा सामना अनिर्णिीत राखण्यावर अधिक भर असेल, हे निश्चित होते. पण, नॅथन लियॉयननं धावसंख्येत चार धावांची भर घातल्यानंतर टीम इंडियाला धक्का दिला. अजिंक्य ४ धावांवर माघारी परतला.

त्यानंतर हनुमा विहारीला न पाठवता रिषभ पंतला बढती देण्यात आली. त्याचा फायदा संघाला पहिल्या सत्रात झाला. रिषभनं जोरदार फटकेबाजी केली. ऑसी कर्णधार टीम पेन यानं त्याला दोन जीवदान दिले. रिषभ हा टीम इंडियाच्या सध्याच्या अंतिम ११मध्ये चौथ्या डावात शतक झळकावण्याचा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज आहे आणि आजही त्याच्याकडून तशीच अपेक्षा होती.

भारतानं २०० धावांचा पल्ला पार केल्यावर पाँटिंग ट्रोल होऊ लागला. सामन्याच्या चौथ्या दिवशी पाँटिंगनं टीम इंडिया दुसऱ्या डावात दोनशे धावाही करणार नाही, असा दावा केला होता आणि त्यामुळे आता त्याला नेटिझन्सच्या ट्रोलचा सामना करावा लागत आहे.

चेतेश्वर पुजारानं कसोटी क्रिकेटमध्ये ६ हजार धावांचा पल्ला ओलांडला. हा पराक्रम करणारा तो ११वा भारतीय फलंदाज आहे. त्यानं १३४ डावांत ६००० धावा केल्या आणि मोहम्मद अझरुद्दीन याचा ( १४३ डाव) विक्रम मोडला. २०१३नंतर पुजारानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीच्या चौथ्या डावात प्रथमच ५०+ धावा केल्या. त्यानं तीन वेळा हा पराक्रम केला आहे.

रिषभ पंत शतक पूर्ण करेल असे वाटत होते, परंतु लियॉनच्या गोलंदाजीवर फटका मारण्याचा मोह तो टाळू शकला नाही आणि गल्लीला उभ्या असलेल्या पॅट कमिन्सनं त्याचा झेल टिपला. पंत ११८ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह ९७ धावांवर माघारी परतला.

कसोटीच्या चौथ्या डावातील भारतीय यष्टिरक्षकानं केलेली दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. २०१८मध्ये रिषभ पंतन इंग्लंडविरुद्ध ११४ धावा चोपल्या होत्या आणि आज त्यानं ९७ धावांची खेळी केली. यापूर्वी २००७ मध्ये महेंद्रसिंग धोनीनं इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत नाबाद ७६ धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेटमध्ये ५००+ धावा करणारा पंत हा पहिलाच आशियाई यष्टिरक्षक आहे. यापूर्वी इंग्लंडच्या अॅलेन नॉट यांनी २२ डावांत ६४३ धावा, वेस्ट इंडिजच्या पॉल डुजॉन यांनी १८ डावांत ५८७ धावा केल्या होत्या. रिषभनं १० डावांत ५०८* धावा केल्या आहेत.

फारूख इंजिनियर यांच्यानंतर एकाच देशात ५००+ कसोटी धावा करणारा रिषभ हा दुसरा भारतीय यष्टिरक्षक आहे. इंजिनियर यांनी वेस्ट इंडिजमध्ये ही कामगिरी केली.