India vs Australia, 3rd Test : टीम इंडियानं मैदानावर उतरवले चार बदली खेळाडू; रिषभ, रवींद्र तंदुरुस्त न झाल्यास काय होणार?

India vs Australia, 3rd Test Day 3 : India vs Australia, 3rd Test Day 3 : सिडनी कसोटीतील तिसरा दिवस ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी गाजवला. भारतीय फलंदाजांनी ऑसींना विकेट दान दिल्या. भारताचे तीन फलंदाज धावबाद होऊन माघारी परतले.

ऑस्ट्रेलियानं दिवसअखेर २ बाद १०३ धावा करताना १९७ धावांची आघाडी घेतली. मार्नस लाबुशेन ६९ चेंडूंत ६ चौकारांसह ४७ धावांवर, तर स्टीव्ह स्मिथ २९ धावांवर खेळत आहे.

तिसऱ्या दिवस भारतासाठी काही खास राहिला नाही. तीन खेळाडू धावबाद झाले आणि नकोसा विक्रम टीम इंडियाच्या नावावर नोंदवला गेला.

मागील ८८ वर्षांत टीम इंडियावर सातव्यांदा कसोटीच्या एका डावात अशी नामुष्की ओढावली. भारतानं एकदा तर चार फलंदाज धावबाद होऊन गमावले होते.

रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांनी दुखापतीमुळे मैदान सोडले. त्यांना दुखापतीचं स्कॅन करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यामुळे तिसऱ्या दिवशी भारताला तंदुरुस्त ११ खेळाडू शोधताना कष्ट घ्यावे लागले.

दुपारच्या सत्रात एक वेळ अशी आली की टीम इंडियाने चार बदली खेळाडू मैदानावर उतरवले. पंत, जडेजा, जसप्रीत बुमराह व आर अश्विन मैदानाबाहेर गेले होते. काही वेळानंतर बुमराह व अश्विन परतले, परंतु पंत व जडेजा यांना उपचारासाठी पाठवण्यात आले.

पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर पंतच्या डाव्या हाताच्या कोपल्याला दुखापत झाली, त्यानंतर मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर जडेजाच्या डाव्या बोटाला ईजा झाली. पंतनं ३६ धावा केल्या, तर जडेजा २८ धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे ही दोघही ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात मैदानावर नव्हती.

रिषभच्या जागी वृद्धीमान सहा यष्टिंमागे दिसला. १९८० ते २०१७ या कालावधीत बदली खेळाडूला यष्टिंमागे उभे राहण्याची परवानगी नव्हती, परंतु तीन वर्षांपूर्वी नियम बदलले. पण, अन्य बदली खेळाडूंप्रमाणे सहा फलंदाजी करू शकत नाही. कारण, पंत आणि जडेजा अजूनही दुसऱ्या डावासाठी उपलब्ध राहणार की नाहीत, हे अद्याप समजलेले नाही.

२०१९मध्ये आलेल्या नियमानुसार कन्कूझ खेळाडूच ( concussed player) फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो. २०१८मध्ये दक्षिण आफ्रिका मालिकेत पार्थिव पटेल दुखापतग्रस्त झाल्यानंतर दिनेश कार्तिक यष्टिरक्षणाला आला होता.

मोहम्मद शमी व उमेश यादव यांनी आधीच दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेतली. त्यात तिसऱ्या कसोटीपूर्वी लोकेश राहुलही दुखापतग्रस्त झाला. आता आणखी दोन धक्के टीम इंडिया पचवू शकत नाही.