India vs Australia, 2nd Test : वडिलांच्या निधनानंतरही मोहम्मद सिराज टीम इंडियासोबत राहिला अन् आज केली ऐतिहासिक कामगिरी!

India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) व रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांच्या दमदार फलंदाजीनंतर भारतीय गोलंदाजांनी Boxing Day कसोटीत ऑस्ट्रेलियाला गुडघे टेकण्यास भाग पाडले. भारताच्या पहिल्या डावातील १३१ धावांची आघाडी भरून काढण्यासाठी मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांवर गडगडला.

मोहम्मद सिराजनं ( Mohammed Siraj) सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह, आर अश्विन व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर उमेश यादवनं एक बळी टिपला. पदार्पणाच्या कसोटीत सिराजनं पाच विकेट्स ( पहिल्या डावात २) घेत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली.

कर्णधार अजिंक्य रहाणेच्या ( ११२) शतकी आणि रवींद्र जडेजाच्या ५७ धावांच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या डावात ३२६ धावा करून १३१ धावांची आघाडी घेतली. जो बर्न्स ( ४), स्टीव्हन स्मिथ ( ८), कर्णधार टीम पेन ( १) ही मंडळी एकेरी धाव करून बाद झाले.

मॅथ्यू वेड ( ४०) व मार्नस लाबुशेन ( २८) यांनी काही काळ संघर्ष केला, परंतु या दोघांना अनुक्रमे रवींद्र जडेजा व आर अश्विन यांनी तंबूत पाठवले. ६ बाद ९९ धावांवरून कमिन्स व ग्रीन या जोडीनं ऑस्ट्रेलियाला १५६ धावांपर्यंत नेले. या दोघांची ५७ धावांची भागीदारी चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात बुमराहनं संपुष्टात आणली.

कमिन्स १०३ चेंडूंत २२ धावांवर माघारी परतला. दुसऱ्या बाजूनं ग्रीनचा संघर्ष सुरूच होता, परंतु सिराजनं त्याला चक्रव्युहात अडकवले. सिराजनं ग्रीनला ( ४५) बाद करून ऑस्ट्रेलियाच्या उरलेल्या आशाही मावळून टाकल्या. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात २०० धावा करता आल्यानं टीम इंडियासमोर विजयासाठी ७० धावांचे माफक लक्ष्य आहे.

मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी सिराजचे वडील मोहम्मद गौस ( ५३ वर्ष) यांचे निधन झाले, त्याला त्यांच्या अंत्यसंस्कारालाही जाता आले नाही. त्यांना फुफ्पुसाशी संबंधित आजार झाला होता. हैदराबाद येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सिराजचे वडील रिक्षाचालक होते. परिस्थिती अतिशय बेताची असतानाही केवळ मुलाचं क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी संपूर्ण कमाई सिराजसाठी खर्च केली. आपल्या मुलाला छोट्या गल्लीतील क्रिकेटमधून बाहेर काढून त्याला स्टेडियमपर्यंत पोहोचविण्यात सिराजच्या वडीलांचा खूप मोठा हात आहे.

मोहम्मद शमी जायबंदी झाल्यामुळे त्याला टीम इंडियात संधी मिळाली आणि आज त्यानं इतिहास घडवला.बॉक्सिंग डे कसोटीत पदार्पणात पाच विकेट्स घेणारा तो पहिलाच परदेशी गोलंदाज ठरला. तसेच पदार्पणात गोलंदाजीत ओपनिंग न करताना भारतीय गोलंदाजानं केलेली ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी सय्यद अबीद अली यांनी १९६७मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटीत ११६ धावांत ७ विकेट्स घेतल्या होता.