India Tour to Sri Lanka : विराट कोहली, महेंद्रसिंग धोनीच्या संघातील ओपनर टीम इंडियाकडून खेळणार; पाच नवीन चेहरे संधीचं सोनं करणार!

India Tour to Sri Lanka : जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी गुरुवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली.

विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ चार महिन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाची दुसरी फळी मैदानावर उतरवण्याची तयारी बीसीसीआयनं केली होती. त्यामुळे कर्णधारपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची सर्वांना उत्सुकता होती. शिखर धवन ( Shikhar Dhawan ) याच्यासह भुवनेश्वर कुमार व श्रेयस अय्यर यांचे नाव शर्यतीत होते, परंतु गब्बरकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

13 जुलै पासून सुरू होणाऱ्या मालिकेत टीम इंडियाचे कर्णधारपद शिखर धवनकडे असणार आहे. ( Shikhar Dhawan has been named captain for India's tour of Sri Lanka). भुवनेश्वरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयनं स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली आहे.

विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक 827 धावा करणाऱ्या पृथ्वी शॉचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. भारत-इंग्लंड मालिकेत खेळणारे राहुल चहर, इशान किशन, सूर्यकुमार यादव यांनाही श्रीलंका दौऱ्यासाठी संघात स्थान मिळाले आहेत. वरुण चक्रवर्थी, नवदीप सैनी आणि दीपक चहर यांचेही संघात पुनरागमन झाले आहे.

नितीश राणा (Nitish Rana) - दिल्लीच्या या डावखुऱ्या फलंदाजानं स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. आयपीएलमध्येही कोलकाता नाईट रायडर्सकडून त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. त्यानं स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये वन डे ( लिस्ट ए) व ट्वेंटी-20चे एकूण 180 सामने खेळले आहेत आणइ त्यात 4800 धावा केल्या आहेत. तो ऑफ स्पिनर म्हणूनही कामगिरी बजावू शकतो.

विजय हजारे ट्रॉफी व सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत धावांचा पाऊस पाडणाऱ्या देवदत्त पडीक्कलनं आयपीएल 2020त पदार्पण केलं. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाकडून खेळताना त्यानं सर्वाधिक धावा केल्या होत्या आणि त्यात एका शतकाचा समावेशही होता. पडीक्कलनं 20 लिस्ट ए क्रिकेटमध्ये 86च्या सरासरीनं 1387 धावा केल्या आहेत, त्यात 6 शतकांचा समावेश आहे. त्यानं 39 ट्वेंटी-20 सामन्यांत 43च्या सरासरीनं व 143च्या स्ट्राईक रेटनं 1466 धावा केल्या आहेत.

महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली आहे. आयपीएलमध्ये तो महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतो. त्यानं भारत अ संघाचेही प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं 59 लिस्ट ए क्रिकेटमध्ये 2681 आणि 46 ट्वेंटी-20त 1337 धावा केल्या आहेत.

खडतर परिस्थितीवर मात करून आयपीएल 2021त राजस्थान रॉयल्सकडून खेळताना चेतन साकरियानं सर्वांंचे लक्ष वेधले. त्यानं 23 ट्वेंटी-20 सामन्यांत 35 विकेट्स घेतल्या आहेत.

कृष्णप्पा गौथमसाठी चेन्नई सुपर किंग्सनं 9.25 कोटी रुपये मोजले. कर्नाटकच्या या ऑलराऊंडरला यंदाच्या पर्वात आतापर्यंत संधी मिळाली नसली तरी त्यानं 47 लिस्ट ए क्रिकेटमध्ये 70 विकेट्स व 558 धावा केल्या आहेत. 62 ट्वेंटी-20 सामन्यांत 41 विकेट्स व 594 धावा आहेत.

भारतीय संघ - शिखर धवन ( कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), युझवेंद्र चहल, राहुल चहर, के गौथम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्थी, भुवनेश्वर कुमार ( उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारीया. नेट बॉलर्स - इशान पोरेल, संदीप वॉरियर्स, अर्षदीप सिंग, साई किशोर, सिमरजीत सिंग