IND vs NZ, 2nd Test Live Updates : घरच्या मैदानावर टीम इंडियाचा बोलबाला; विराट कोहली, आर अश्विन यांनीही नोंदवले वर्ल्ड रिकॉर्ड, पाकिस्तानलाही दिला शॉक

India vs New Zealand, 2nd Test Live Updates : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीतील विजयाची औपचारिकता चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच पूर्ण केली. तिसऱ्या दिवसअखेर भारतानं ५ विकेट्स घेत न्यूझीलंडला पराभवाच्या दिशेनं ढकलले होतेच, त्यात चौथ्या दिवसात जयंत यादवनं ( Jayant Yadav) न्यूझीलंडचा डाव गुंडाळला.

भारताच्या पहिल्या डावातील ३२५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांवर गडगडला. भारतानं ७ बाद २७६ धावांवर दुसरा डाव घोषित केला. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात हेन्री निकोल्स ( ४४) व डॅरील मिचेल ( ६०) यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगला सामना केला. मिचेलनं वैयक्तिक अर्धशतकासह निकोल्सह ७३ धावांची भागीदारी केली.

निकोल्स व मिचेल यांच्याशिवाय न्यूझीलंडच्या अन्य फलंदाजांचा भारतीय गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. न्यूझीलंडचा डाव १६७ धावांवर गुंडाळून भारतानं ३७२ धावांनी विजय मिळवला. आर अश्विन व जयंत यादव यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या.

भारतानं घरच्या मैदानावर २०१३पासून सुरू असलेली कसोटी मालिका विजयाची परंपरा कायम राखली. भारताचा हा घरच्या मैदानावरील १४वा कसोटी मालिका विजय ठरला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हा ११वा कसोटी मालिका विजय ठरला.

न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावरील भारताचा हा सलग चौथा कसोटी मालिका विजय आहे. भारतानं घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध १२ कसोटी मालिका खेळल्या आणि त्यापैकी एकही गमावली नाही.

२०२१मध्ये सर्वाधिक ७ कसोटी जिंकण्याचा विक्रम भारतानं नावावर करताना पाकिस्तान ( ६) व इंग्लंड ( ४) यांना मागे टाकले. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये ५० विजय मिळवणारा विराट कोहली हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

भारताचा कसोटी क्रिकटेमधील धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय आहे. भारतानं न्यूझीलंडवर ३७२ धावांनी विजय मिळवला. यापूर्वी दिल्ली कसोटीत २०१५मध्ये दक्षिण आफ्रिकेवर ३३७ धावांनी, इंदोर कसोटीत २०१६मध्ये न्यूझीलंडवर ३२१ धावांनी विजय मिळवला होता.

आर अश्विननं घरच्या मैदानावर ३००+ कसोटी विकेट्स घेणाऱ्या गोलदाजांमध्ये स्वतःचं नाव नोंदवलं आहे. मुथय्या मुरलीधरन, जेम्स अँडरसन, अनिल कुंबळे, स्टुअर्ट ब्रॉड, शेन वॉर्न यांना हा पराक्रम करता आला आहे. भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेत सर्वाधिक ६६ विकेट्स घेऊन अश्विननं सर रिचर्ड्स हॅडली ( ६५) यांचा विक्रम मोडला. भारताकडून बिशन सिंग बेदी यांनी ५७ विकेट्स घेतल्या होत्या.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक १३ विजय मिळवत विराटनं मोठा पराक्रम केला. शिवाय कसोट क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ३९ विजय मिळवून विराटनं क्लाईव्ह लॉइड यांचा ( ३६) विक्रम मोडला. या विक्रमात ग्रॅमी स्मिथ ( ५३), रिकी पाँटिंग ( ४८), स्टीव्ह वॉ ( ४१) हे आघाडीवर आहेत.