टार्गेट ३८१ शक्य; वीरूची मॅजिकल खेळी अन् सचिन तेंडुलकरचं नाबाद शतक, टीम इंडियाला हवाय असा करिष्मा

India vs England, 1st Test Day 4 : हिटमॅन रोहित शर्मा ( Rohit Sharma) दुसऱ्या डावातही अपयशी ठरल्यानं टीम इंडियाची चिंता वाढली आहे.

इंग्लंडनं विजयासाठी ठेवलेल्या ४२० धावांचा पाठलाग करताना भारताला २५ धावांवर पहिला धक्का दिला. रोहित ( १२) माघारी परतल्यामुळे चाहते निराश झाले आहेत. चौथ्या दिवसअखेर भारतानं १ बाद ३९ धावा केल्या आहेत. पाचव्या दिवशी त्यांना ३८१ धावांची गरज आहे.

आऱ अश्विननं ६ विकेट्स घेत इंग्लंडचा दुसरा डाव १७८ धावांवर गुंडाळला. खेळपट्टीचा कल आता पूर्णपणे गोलंदाजांच्या बाजूनं झुकल्यानं सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार हे निश्चित आहे. इंग्लंडनं पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे टीम इंडियासमोर ४२० धावांचे लक्ष्य उभे राहिले.

चौथ्या डावात टीम इंडियासमोर मोठे लक्ष्य आहे. पण, यापूर्वी १९७६मध्ये भारतीय संघानं पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध ४०३ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. सुनील गावस्कर ( १०२) आणि गुंडप्पा विश्वनाथ ( ११२) यांची शतकी खेळी, मोहिंदर अमरनाथ ( ८५) व ब्रिजेश पटेल ( ४९*) यांनी हा सामना खेचून आणला होता.

टीम इंडियाला ४५ वर्षांपूर्वीचा हा विक्रम मोडण्याची संधी आहेच. पण, आजच्या सामन्यासारखी अवस्था २००८मध्येही झाली होती. तेव्हा ग्राऊंडही हेच होतं अन् प्रतिस्पर्धीही...

२००८च्या त्या कसोटीत इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३१६ धावांचा पाठलाग करताना भारताचा पहिला डाव २४१ धावांवर गडगडला होता. इंग्लंडनं ९ बाद ३११ धावांवर दुसरा डाव घोषित करून भारतासमोर ३८७ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

चौथ्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी २९ षटकं शिल्लक करताना इंग्लंडचा कर्णधार केव्हीन पीटरसन यानं डाव घोषित केला, पण तो त्याच्यावरच उलटवला. वीरेंद्र सेहवागनं ६८ चेंडूंत ११ चौकार व ४ खणखणीत षटकार खेचून ८३ धावांची स्फोटक खेळी केली. टीम इंडियानं त्या २९ षटकांत १ बाद १३१ धावा कुटल्या.

पाचव्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी २५६ धावा बनवायच्या होत्या. गौतम गंभीर ६६ धावांवर आणि राहुल द्रविड ४ धावांवर माघारी परतल्यानंतर सचिन तेंडुलकरनं खिंड लढवली. त्याला युवराज सिंगची साथ मिळाली.

सचिननं १९६ चेंडूंत ९ चौकारांसह नाबाद १०३ धावा केल्या. युवी १३१ चेंडूंत ८ चौकार व १ षटकार खेचून ८५ धावांवर नाबाद राहिला आणि टीम इंडियानं ६ विकेट्स राखून हा सामना जिंकून इतिहास घडवला. भारतानं घरच्या मैदानावर पाठलाग केलेली ही यशस्वी धावसंख्या आहे.

आता चेन्नईत सुरु असलेल्या कसोटीत टीम इंडियाला वीरूसारखी स्फोटक खेळीची आवश्यकता होती आणि पाचव्या दिवशी सचिन, युवी व गंभीर यांच्यासारखा संयम दाखवण्याची गरज आहे.