India vs England, 1st Test : १००व्या कसोटीत जो रूटचा World Record!; सुनील गावस्कर यांचाही मोडला विक्रम

India vs England, 1st Test : इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) यानं भारतीय गोलंदाजांना हतबल केले. त्यानं १००व्या कसोटीत द्विशतक झळकावताना विश्वविक्रमाला गवसणी घातली. जावेद मियाँदाद, गॉर्डन ग्रिनीज, व्हिव्हियन रिचर्ड्, रिकी पाँटिंग या दिग्गजांनाही न जमलेला पराक्रम रुटनं चेन्नई कसोटीवर करून दाखवला. इंग्लंडच्या ४ बाद ४५४ धावा झाल्या आहेत.

१२७व्या षटकात भारताला रूट व स्टोक्सची जोडी तोडण्यात यश आलं. नदीमच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात स्टोक्स चेतेश्वर पुजाराच्या हातून झेलबाद झाला. रुट व स्टोक्स या जोडीनं चौथ्या विकेटसाठी २२१ चेंडूंत १२४ धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी रुटनं तिसऱ्या विकेटसाठी डॉम सिब्लीसह २०० धावा जोडल्या होत्या.

इंग्लंडनं कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच भारतात तिसऱ्या व चौथ्या विकेटसाठी एकाच डावात शतकी भागीदारी करण्याचा विक्रम केला. यापूर्वी त्यांनी पाच वेळा भारताविरुद्ध अशी कामगिरी केली होती, परंतु त्या सर्व त्यांच्या देशात. २०११ ( एडबस्टन व ट्रेंट ब्रीज), १९९० ( लॉर्ड्स), १९७९ ( एडबस्टन) व १९६७ ( हेडिंग्ली) येथे त्यांनी ही कामगिरी केली होती.

बेन स्टोक्स ११८ चेंडूंत १० चौकार व ३ षटकार खेचून ८२ धावांवर माघारी परतला. इंग्लंडनं २००४ ( दक्षिण आफ्रिका) व २००५ ( पाकिस्तान) सालानंतर प्रथमच परदेशात पहिल्या डावात ४००+ धावा करण्याचा पराक्रम आज केला.

कर्णधार म्हणून चेन्नई कसोटीत सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा विक्रम रुटनं नावावर केला. त्यानं सुनील गावस्कर यांचा ( १९८०) १६६ धावांचा विक्रम मोडला.

१००व्या कसोटीत नाबाद १८८ धावांचा इंझमाम उल हक याचा विक्रमही जो रूटनं आज मोडला. जो रुटचे हे पाचवे कसोटी द्विशतक आहे आणि कर्णधार म्हणून तिसरे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ५७ कसोटी सामने खेळले, परंतु एकाही प्रतिस्पर्धी खेळाडूला द्विशतक झळकावता आले नव्हते, जो रूटनं तो पराक्रम करून दाखवला. षटकार मारून द्विशतक पूर्ण करणारा जो रूट हा इंग्लंडचा पहिलाच खेळाडू आहे.

२०१३/१४साली ब्रेंडन मॅकलम यानं वेलिंग्टन कसोटीत भारताविरुद्ध ३०२ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताविरुद्ध द्विशतक झळकावणारा तो पहिलाच खेळाडू आहे. यापूर्वी २०१०/११मध्ये मॅकलमनं हैदराबाद कसोटीत २०० धावा चोपल्या होत्या.

भारतात नाबाद २०८ धावा करून जो रूटनं इंग्लंडकडून सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद केली. यापूर्वी माईक गॅटींग यांनी १९८४/८५मध्ये चेन्नईत २०७ धावा केल्या होत्या.