India vs England, 1st Test : तीन वर्षांनंतर जसप्रीत बुमराहनं घेतली भारतात पहिली विकेट; जाणून घ्या एका क्लिकवर!

India vs England, 1st Test : चांगल्या सुरुवातीनंतर इंग्लंडच्या संघाला सलग दोन धक्के बसले. रोरी बर्न्स आणि डॉम सिब्ली यांनी अर्धशतकी भागीदारी केली. पण, आर अश्विननं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर जसप्रीत बुमराहनं ( Jasprit Bumrah) डॅन लॉरेन्स याला पायचीत करून माघारी पाठवले. जसप्रीतची भारतातील ही पहिलीच कसोटी विकेट ठरली. कशी ते जाणून घ्या...

जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) आज घरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळत आहे. भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यातला पहिला कसोटी सामना आजपासून चेन्नईत सुरू झाला. १७ कसोटी सामने व ७९ विकेट्सनंतर बुमराहला भारतात पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली.

पहिल्याच चेंडूवर रिषभ पंतनं ( Rishabh Pant) यष्टिंमागे इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्स ( Rory Burns) याचा झेल सोडला. ओव्हर दी विकेट गोलंदाजी करताना बुमराहनं टाकलेला चेंडू बर्न्सच्या बॅटची कडा घेत उजव्या बाजूला पंतच्या दिशेनं गेला, परंतु पंतला तो अवघड झेल टिपता आला नाही.

५ जानेवारी २०१८मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जसप्रीत बुमराहनं कसोटी संघात पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं इंग्लंड, ऑस्ट्रेलिया. वेस्ट इंडिज व न्यूझीलंड असे दौरे गाजवले. त्यानं १७ कसोटी सामन्यांत ७९ विकेट्स घेतल्या आणि ६ बाद २७ ( वि. वेस्ट इंडिज) ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.

आज मायदेशात बुमराह प्रथमच कसोटी सामना खेळत आहे. तब्बल तीन वर्षांनंतर त्याला मायदेशात कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. यापूर्वी जवागल श्रीनाथनं १२ कसोटीनंतर मायदेशात पहिला सामना खेळला होता. आर पी सिंग ( ११) व सचिन तेंडुलकर ( १०) यांनाही ही प्रतीक्षा करावी लागली.

घरच्या मैदानावर पहिला सामना खेळण्यासाठी १७ किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांची प्रतीक्षा पाहावी लागलेला बुमराह हा दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजच्या डॅरेन गंगा ( Daren Ganga) यानं १९९८मध्ये दक्षिण आफ्रिकेत कसोटी पदार्पण केलं आणि त्यानंतर एप्रिल २००३मध्ये घरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला.

लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडच्या २ बाद ६७ धावा झाल्या आहेत. इंग्लंडच्या ६३ धावांवर एकही विकेट गेलेला नव्हता.