ICC World Test Championship नं साऱ्यांनाच केलं मालामाल; जाणून घ्या प्रत्येक संघाला मिळाली किती बक्षीस रक्कम!

Team-Wise Prize Money Won In The Tournament जून २०१९पासून सुरू झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला २३ जून २०२१ मध्ये पहिला विजेता मिळाला. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघानं जेतेपदाची मानाची गदा अन् कोट्यवधींची बक्षीस रक्कम जिंकली. अंतिम सामन्यात त्यांनी टीम इंडियावर ८ विकेट्सन पराभूत केलं. कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसीनं WTC ही स्पर्धा सुरू केली आणि त्यातून सर्व कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या संघांनाही चांगली बक्षीस रक्कम मिळाली.

बांगलादेश संघाला WTCच्या गुणतालिकेत ९व्या स्थानावर समाधान मानावे लागले. बांगलादेशच्या काही मालिका कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आल्या. त्यामुळे बांगलादेशला ७ सामने खेळता आले आणि त्यात सहा पराभव व १ अनिर्णित सामना असा निकाल लागला. त्यांना २० गुणच मिळाले आणि बीसीसीआयकडून त्यांना ७४ लाखांचं बक्षीस मिळालं.

वेस्ट इंडिजनं १३ सामन्यांत ३ विजय मिळवले, तर त्यांना ८ सामन्यांत पराभव पत्करावा लागला अन् २ सामने अनिर्णीत राहिले. त्यांनी १९४ गुणांची कमाई केली. आयसीसीनं त्यांनाही ७४ लाखांचं बक्षीस दिलं.

श्रीलंकेनं १२ पैकी २ सामन्यांत विजय मिळवला. ६ पराभव व ४ सामने अनिर्णीत राहिले. २०० गुण मिळवणाऱ्या श्रीलंकेलाही ७४ लाखांचे बक्षीस मिळाले.

पाकिस्ताननं २८६ गुणांची कमाई करताना १२ सामन्यांत ४ विजय मिळवले. त्यांना ५ पराभव पत्करावे लागले, तर ३ सामने अनिर्णीत राहिले. पाकिस्तानलाही ७४ लाखांचे बक्षीस मिळाले.

भारताविरुद्धचा पराभव इंग्लंडला फायनलपासून दूर घेऊन गेला. इंग्लंडला २१ पैकी ११ सामन्यांत विजय मिळवून ४४२ गुणांची कमाई करता आली. त्यांना ७ पराभव पत्करावे लागले आणि ३ सामन्यांचा निकाल अनिर्णीत लागला. त्यांना २.६ कोटींचं बक्षीस मिळालं.

दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत २६४ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांनी १३ पैकी ५ सामने जिंकेल, तर ८ मध्ये त्यांना हार मानावी लागली. त्यांना १.४५ कोटींचे बक्षीस मिळाले.

ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केला अन् त्यांचेही अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न अपूरे राहिले. १४ सामन्यांत ८ विजय, ४ पराभव व २ अनिर्णीत निकाल, अशी त्यांची कामगिरी. ३३२ गुणांची कमाई करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला ३.३ कोटींचे बक्षीस मिळाले.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या टीम इंडियाला ५.९ कोटी रक्कम मिळाली. १७ सामन्यांत त्यांनी १२ विजय मिळवले, ४ पराभव व १ अनिर्णित निकाल लागले. ५२० गुणांसह टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे.

न्यूझीलंडच्या संघानं जेतेपद पटकावून ११.८ कोटी रुपयाचं बक्षीसही नावावर केले. त्यांनी ११ सामन्यांपैकी ७ विजय मिळवले व ४ सामने पराभूत झाले. त्यांच्या खात्यात ४२० गुण आहेत.