वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान कोणाला?

वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना आज लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना जेतेपद पटकावून इतिहास घडविण्याची संधी आहे. या दोन्ही संघांना आतापर्यंत एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही आणि आजचा विजेता हा क्रिकेटला लाभलेला नवा जेता ठरणार आहे. त्यामुळे आज कोण जिंकणार? कोणाचे पारडे जड असणार? हा चर्चा होणे साहजिकच आहे. पण, त्यापलिकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे ते स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू कोण ठरणार, याकडे.. या शर्यतीत भारताकडून रोहित शर्मा आघाडीवर असला, तरी त्याच्यासमोर कडवे आव्हान उभे आहे.

भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले असले तरी रोहित शर्मानं ही स्पर्धा गाजवली. त्यानं 9 सामन्यांत 5 शतकांसह 648 धावा केल्या आहेत आणि स्पर्धेतील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. इंग्लंडचा जो रूट ( 549) धावांसह चौथ्या स्थानावर आहे. त्याला रोहितचा विक्रम मोडण्यासाठी आज शतकी खेळी करावी लागेल.

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हानही उपांत्य फेरीत संपुष्टात आले असले तरी मिचेल स्टार्क सर्वाधिक 27 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्यानं 10 सामन्यांत 27 विकेट घेतल्या आहेत.

इंग्लंडचा जोफ्रा आर्चरचा हा पहिलाच वर्ल्ड कप आहे. त्याने पदार्पणातच धुमाकूळ घातला आहे. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो 19 विकेटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला या यादीत अव्वल स्थान पटकवायचे असल्यास आज आठ विकेट घ्याव्या लागतील.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन हाही या शर्यतीत आहे. 10 सामन्यांत त्याच्या नावावर 548 धावा आहेत आणि स्पर्धेत सातत्याने धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. त्यामुळे अंतिम फेरीतही त्याच्याकडून दमदार खेळाची अपेक्षा आहे.

बांगलादेशचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले असले तरी त्यांच्या शकीब अल हसनने ही स्पर्धा अविस्मरणीय बनवली. जगातील सर्वोत्तम अष्टपैलू असलेल्या शकीबला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यानं 8 सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या आहेत, शिवाय 606 धावाही चोपल्या आहेत.

वर्ल्ड कप स्पर्धेत 600 धावा आणि 10+ विकेट अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.