ICC World Cup 2019 : सचिन तेंडुलकर ते ब्रायन लारा... पाच वर्ल्ड कप खेळलेले दहा दिग्गज!

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या लढतीनं क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होत आहे. इंग्लंड हे जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत, तर आफ्रिका चोकर्स हा टॅग मिटवण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरणार आहेत. गेली अनेक वर्ष या स्पर्धेने अनेक विक्रम होताना आणि मोडताना पाहिले. वर्ल्ड कप म्हटले की महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचे नाव समोर आलेच पाहिजे. सर्वाधिक सहा वर्ल्ड कप खेळण्याचा पाकिस्तानच्या जावेद मियाँदादच्या विक्रमाशी त्याने 2011मध्ये बरोबरी केली. तेंडुलकर आणि मियाँदाद यांच्यासह हे दहा दिग्गज पाच वर्ल्ड कप खेळले आहेत.

जावेद मियाँदाद ( 1975, 1979, 1983, 1987, 1992, 1996) - पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज जावेद मियाँदाद हा सहा वर्ल्ड कप स्पर्धा खेळणारा पहिलाच खेळाडू आहे. इम्रान खानच्या नेतृत्वाखाली 1992च्या वर्ल्ड कप विजेत्या पाकिस्तान संघात मियाँदादचा सहभाग होता. त्याने 33 सामन्यांत 1083 धावा केल्या आहेत.

सचिन तेंडुलकर (1992, 1996, 1999, 2003, 2007, 2011) - भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने 2011साली वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न पूर्ण केले. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तेंडुलकरच्या नावावर आहेत. त्याने 45 सामन्यांत 2278 धावा केल्या आहेत. वर्ल्ड कपमध्ये 2000 पेक्षा अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

इम्रान खान (1975, 1979, 1983, 1987) - इम्रान खानच्या नावावरही पाच वर्ल्ड कप खेळण्याचा विक्रम आहे. त्याने 28 सामन्यांत 666 धावा केल्या आहेत, परंतु गोलंदाजीत त्याने 19.26च्या सरासरीनं 34 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 1992मध्ये वर्ल्ड कप उंचावला. इंग्लंडविरुद्धच्या जेतेपदाच्या सामन्यात त्याने 110 चेंडूंत 72 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती.

अर्जुन रणतुंगा (1983, 1987, 1992, 1996, 1999) - अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने 1996मध्ये वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. रणतुंगाने चौथ्या प्रयत्नात वर्ल्ड कप जिंकण्यात यश मिळवले. 1996च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.

अरविंद डी'सिल्वा (1987, 1992, 1996, 1999, 2003) - श्रीलंका संघाने 1996च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला, त्या सामन्यात अरविंद डी'सिल्वा ( नाबाद 107 धावा) मॅच ऑफ दी मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्याने पाच वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये मिळून 1000हून अधिक धावा केल्या आहेत.

वसिम अक्रम (1987, 1992, 1996, 1999, 2003) - दिग्गद जलदगती गोलंदाज वसिम अक्रमने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्याने 1992च्या वर्ल्ड कप स्पर्धेत 10 सामन्यांत 18 विकेट्स घेतल्या. अंतिम सामन्यात त्याने ( 18 चेंडूंत 33 धावा आणि 3/49) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मॅच ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला होता. त्याने वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 55 विकेट्स घेतल्या आहेत.

इंजमाम-उल-हक ( 1992, 1996, 1999, 2003, 2007) - इंजमाम-उल-हकला पाचही वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये प्रभावशाली कामगिरी करता आलेली नाही. त्याने 35 सामन्यांत 717 धावा केल्या. 1992च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने 35 चेंडूंत 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

सनथ जयसूर्या (1992, 1996, 1999, 2003, 2007) - वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सनथ जयसूर्या सहाव्या क्रमांकावर येतो. त्याने 38 सामन्यांत 1165 धावा केल्या आहेत.

ब्रायन लारा (1992, 1996, 1999, 2003, 2007) - कप स्पर्धा इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ब्रायन लारा चौथ्या क्रमांकावर येतो. त्याच्या नावावर 34 सामन्यांत 1225 धावा आहेत.

रिकी पाँटिंग (1996, 1999, 2003, 2007, 2011) - वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रिकी पाँटिंग ओळखला जातो. त्याने कर्णधार म्हणून दोन वर्ल्ड कप उंचावले आहेत, तर सलग चार वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत ( 1996, 1999, 2003, 2007) खेळण्याचा मानही त्याच्या नावावर आहे. त्याने 2003च्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना 121 चेंडूंत नाबाद 140 धावा चोपल्या होत्या.