आयसीसीची क्रिकेट रसिकांना मेजवानी, आठ वर्षांत होणार १० विश्वचषक, असं आहे वेळापत्रक

ICC World Cups: आयसीसीने पुढील आठ वर्षांसाठीच्या फ्युचर टूर्स प्रोग्रॅम (FTP)ची घोषणा केली आहे. या एफटीपीनुसार टी-२० विश्वचषक दर दोन वर्षांनी आयोजित होणार आहे. तर ५० षटकांचा विश्वचषकात २०२७ पासून १४ संघ सहभागी होतील.

आयसीसीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत अनेक मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आयसीसीने पुढील आठ वर्षांसाठी फ्युचर टूर्स प्रोग्रॅम तयार केला आहे. तसेच याचवर्षी भारतात होत असलेल्या टी-२० विश्वचषकासाठीही बीसीसीआयला काहीचा दिलासा दिला आहे. या बैठकीत आयसीसीने घेतलेले काही निर्णय हे क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानी ठरणारे आहेत.

आयसीसीच्या फ्यूचर टूर्स प्रोग्रॅमनुसार २०२४ ते २०३१ या काळात ४ टी-२० विश्वचषक आयोजित होतील. ज्यामध्ये २० संघ सहभागी होतील. त्याशिवाय दोन एकदिवसीय विश्वचषक स्पर्धांचेही आयोजन होणार आहे. त्यात १४ संघ सहभागी होतील. यादरम्यान २ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ४ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धांचेही आयोजन होणार आहे.

आयसीसीने निर्णय घेतला की, २०२४ ते २०३१ दरम्यान, होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये एकूण ५५ सामने होतील. तसेच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये प्रत्येकी ५४ सामने खेळवले जातील. पुरुषांच्या विश्वचषकात सात सात संघाचे दोन गट असतील टॉप ३ संघ सुपरसिक्स फेरीत पोहोचतील. हा फॉर्मॅट २००३ च्या विश्वचषकात वापरण्यात आला होता. तर टी-२० विश्वचषकात पाच पाच संघांचे चार गट असतील. अव्वल दोन संघ सुपर-८ मध्ये पोहोचतील. त्यानंतर उपांत्य आणि अंतिम फेरी होईल.

आयसीसीने बंद केलेली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २०२५ मध्ये पुन्हा आयोजित होईल. त्यानंतर २०२९ मध्ये या स्पर्धेचे पुन्हा आयोजन केले जाईल.

आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२५, २०२७, २०२९ आणि २०३१ मध्ये आयोजित होईल. तर महिलांच्या स्पर्धांचे वेळापत्रक आधीच जाहीर झालेले आहे.

आयसीसीच्या बोर्डाने पुढील वेळापत्रकासाठी सर्व पुरुष, महिला आणि १९ वर्षांखालील स्पर्धांच्या यजमानांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यासही मान्यता दिली आहे. पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धांच्या यजमान देशांची निवड सप्टेंबरमध्ये होणार आहे. तर महिलांच्या स्पर्धा आणि टी-२० स्पर्धांसाठीच्या यजमानांची निवड नोव्हेंबरमध्ये होईल.