Happy Birthday Rohit : फार कमी जणांना माहिती आहेत 'हिटमॅन' रोहित शर्माचे हे तीन विक्रम!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'हिटमॅन' म्हणून किर्ती गाजवणाऱ्या रोहित शर्माचा आज 33 वा वाढदिवस... नागपूरच्या बनसोड येथे त्याचा जन्म झाला. त्याचे वडील सुतारकाम करायचे. त्याच्या काकांनी त्याला मुंबईत आणले आणि तेथून त्याच्या क्रिकेटचा प्रवास सुरु झाला.

1999मध्ये काकांनी दिलेल्या पैश्यांमुळे तो क्रिकेट कॅम्पला गेला. हॅरिस शिल्ड आणि गाईल्स शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत पदार्पणातच त्यानं सलामीवीर म्हणून शतक झळकावलं होतं. आता तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे.

कारकिर्दीच्या पहिल्या सहा वर्षांत रोहितला अनेक चढउतारांचा सामना करावा लागला, परंतु माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं त्याला सलामीला खेळण्याची संधी दिली अन् त्याचं नशीब बदललं. भारताच्या वन डे आणि ट्वेंटी-20 संघांचा तो कायमस्वरूपी सदस्य आहे.

कसोटी संघातील त्याचे स्थान डळमळीचे राहीले आहे, परंतु गतवर्षी घरच्या मैदानावर त्यानं कसोटीतील स्थानही पक्क केलं. वन डे क्रिकेटमध्ये एकापेक्षा अधिक द्विशतकं नावावर असलेला जगातला एकमेव फलंदाज म्हणून रोहित ओळखला जातो. पण, त्याचे असे तीन विक्रम आहेत की जे फार कमी लोकांना माहीत आहेत..

मनीष पांडे किंवा सुरेश रैना हे ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारे पहिले भारतीय नव्हेत, तर हा विक्रम रोहितच्या नावावर आहे. ट्वेंटी-20 क्रिकेट तेव्हा फार चर्चेत नव्हते, म्हणून रोहितचा हा विक्रम कोणाच्या लक्षात आला नाही.

मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करताना रोहितनं गुजरात संघाविरुद्ध ट्वेंटी-20त हा विक्रम केला. त्यानं 2006-07मध्ये स्थानिक ट्वेंटी-20 क्रिकेट सामन्यांत गुजरावविरुद्ध 45 चेंडूंत शतकी खेळी केली होती. त्यात 13 चौकार व 5 षटकारांचा समावेश होता.

सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या कसोटी मालिकेत रोहितला खेळण्याची संधी मिळाली. त्यानं वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्या दोन सामन्यांच्या मालिकेत सलग दोन शतकं झळकावली. पदार्पणानंतर सलग दोन कसोटी सामन्यांत शतक झळकावण्याचा विक्रम रोहितनं नावावर केला. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी तीन सलग शतकांचा विक्रम नोंदवला आहे.

या विक्रमासह रोहित सौरव गांगुली, जेम्स निशॅम, बिल पोन्सफोर्ड, डॉज वॉटलर्स, अॅलव्हीन कालिचरण, ग्रेग ब्लेवेट आणि अबीद अली यांच्या पंक्तीत जाऊन बसला.

2013मध्ये वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा रोहित तीसरा फलंदाज ठरला. पण, सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना जे करता आलं नाही ते रोहितनं केलं. त्यानं षटकार खेचून द्विशतक पूर्ण केले आणि आजही हा विक्रम त्याच्या नावावर आहे.

वन डेत द्विशतक झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये ख्रिस गेल, मार्टिन गुप्तील आणइ फाखर झमान या फलंदाजांचाही समावेश आहे. रोहितनं त्यानंतर 2014 आणि 2017मध्ये दुसरे व तिसरे द्विशतक झळकावले.