नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न: IPL 2020बाबतच्या 'त्या' निर्णयावरून फ्रँचायझींमध्ये मतभेद

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13 व्या मोसमासाठी कंबर कसली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) बैठकीत ट्वेंटी-20 वर्ल्ड कपबाबत ठोस निर्णय अजूनही झालेला नाही. तरीही बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीनं आयसीसीच्या बैठकीनंतर लगेच राज्य संघटनांना पत्र पाठवून आयपीएलसाठी सज्ज राहण्यास सांगितले.

कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता प्रेक्षकांविना आयपीएल खेळवण्याची तयारी बीसीसीआयनं दर्शवली आहे. पण, बीसीसीआयच्या या निर्णयामुळे फ्रँचायझींमध्ये मतभेद सुरू झाल्याचे वृत्त आहे.

कोरोना व्हायरसमुळे प्रेक्षकांविना स्पर्धा खेळवण्याचा नवा पायंडा पडला आहे. त्यामुळे बीसीसीआयनंही रिकाम्या स्टेडियममध्ये आयपीएल खेळवण्याची तयारी दर्शवली आहे. पण, आयपीएलच्या काही संघमालकांना बीसीसीआयची ही कल्पना आवडलेली नाही.

कोलकाता नाइट रायडर्सचे सीईओ आणि एमडी वेंकी मैसोर यांनी या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले,''खेळाडू, प्रेक्षक, स्टाफ आणि प्रत्येकाच्या आरोग्याचा व सुरक्षिततेला प्राधान्य द्यायला हवं. त्यासाठी नियम बनले आहेत. त्यामुळे जर आयपीएल 20202 झाल्यास ती प्रेक्षकांशिवाय होईल, हे गृहित धरायला हवं. त्यासाठी सर्वांनी तयार रहायला हवं.''

पण, मैसोर यांनी आयपीएल झाल्यास त्याच्या फॉरमॅटमध्ये कोणताही बदल खपवून घेतला जाणार नाही, हे स्पष्ट केले.

दिल्ली कॅपिटल्सचे सीईओ धीरज मल्होत्रा यांनी सांगितले की,''सध्या हाच एक पर्याय समोर आहे. एकूण महसूलातील 15-20% रक्कम मी स्टेडियममधील प्रेक्षकांमुळे मिळत होती. प्रेक्षकांविना आयपीएलचा थरार वेगळा असेल, परंतु प्रत्येकानं ते मान्य करायला हवं.''

चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांना प्रेक्षकांविना खेळवण्याच्या मुद्द्यावरून बीसीसीआयकडून आणखी स्पष्टता हवी आहे. हा अखेरचा पर्याय असायला हवा, असेही त्यांचे मत आहे.