धक्कादायक; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 'तिची' अचानक विश्रांती

ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलनं काही दिवसांपूर्वी मानसिक ताण वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. तसाच निर्णय पाकिस्तानची माजी कर्णधार साना मीरनं घेतला आहे. तिनं डिसेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेतून माघार घेतली आहे.

आयसीसीच्या वन डे क्रिकेटमधील महिलांच्या गोलंदाजी क्रमवारीत 33 वर्षीय मीर पाचव्या, अष्टपैलूंमध्ये 9व्या स्थानावर आहे. त्यामुले तिच्या या निर्णयानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ही विश्रांती किती काळ असेल, याबाबत तिनं स्पष्टीकरण दिलेलं नाही. या निर्णयामुळे तिला आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेचे तीन सामने आणि इंग्लंडविरुद्धच्या तीन ट्वेंटी-20 सामन्यांना मुकावे लागेल. शिवाय पुढील वर्षी होणाऱ्या महिला ट्वेंटी-20 स्पर्धेतही तिच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.

ती म्हणाली,''आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काही काळ दूर राहण्याचा निर्णय मी घेत आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी मी उपलब्ध नसेन. या वेळेत मी भविष्याबाबत विचार करेन.''

मीरनं 120 वन डे सामन्यांत 151 विकेट्स, 106 ट्वेंटी-20त 89 विकेट्स घेतल्या आहेत.