भारतीय संघात पुनरागमनाची अजूनही संधी; पाहा कोण आहेत हे महारथी!

टीम इंडियात कधी कोण पुनरागमन करेल याचा नेम नाही. आशिष नेहराचंच उदाहरण बघा... जवळपास पाच वर्षांनंतर ( ट्वेंटी-20 संघ, 2016 ऑस्ट्रेलिया दौरा) त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले. त्यानंतर त्यानं 22 महिन्यांत आशिया चषक आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही खेळला.

नेहराच नव्हे तर राहुल द्रविडलाही असेच अचानक वन डे संघात पुनरागमनाची संधी दिली होती. त्यानंतर द्रविड पाच वन डे आणि एक ट्वेंटी-20 सामना खेळून निवृत्त झाला होता. सध्याचे संघ व्यवस्थापनही असेच काही निर्णय घेऊ शकतील आणि त्यांच्यासमोर कोणते पर्याय असू शकतील ते पाहूयात..

अक्षर पटेल - 2018च्या आशिया चषक स्पर्धेपूर्वी अक्षर पटेलच्या दुखापतीनं रवींद्र जडेजाचा वन डे क्रिकेटमध्ये पुनरागमनाचा मार्ग मोकळा केला. 2018नंतर अजूनही अक्षर टीम इंडियात पुनरागमनाची प्रतीक्षा करत आहे. भारत अ संघाचा तो नियमित सदस्य आहेत, परंतु त्याचे नाव निवड समिती विचारात घेत नाही.

इंडियन प्रीमिअर लीगच्या आगामी मोसमात दमदार कामगिरी करून ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघाच्या शर्यतीत येण्याचा त्याचा प्रयत्न असेल. 2014मध्ये त्याला आयपीएलच्या कामगिरीवरच टीम इंडियात स्थान मिळाले होते आणि त्याची पुनरावृत्ती 2020मध्येही होते का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

करुण नायर - इंग्लंडविरुद्धच्या 2018च्या कसोटी संघात करून नायरला बाजूला करत हनुमा विहारीला अनपेक्षित स्थान देण्यात आले होते. 2017नंतर करूण नायर संघाबाहेरच आहे. दुलीप चषक स्पर्धेत भारत रेड संघाचा तो सदस्य होता, परंतु निराशाजनक कामगिरीमुळे त्याला भारत अ संघात स्थान पटकावता आले नाही.

स्थानिक क्रिकेटच्या या मोसमात त्याला साजेसा खेळ करता आलेला नाही. त्यामुळे त्याला पुढील मोसमाची प्रतीक्षा पाहावी लागेल. त्यात चांगली कामगिरी करून तो इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल.

जयदेव उनाडकट - 2017च्या आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर त्यानं टीम इंडियाच्या मर्यादित षटकांच्या संघात पुनरागमन केले होते, परंतु सध्या त्याचे लक्ष्य भारत अ च्या कसोटी संघात स्थान पटकावण्याचे आहे. यंदाच्या रणजी मोसमात त्यानं 13 डावांत 55 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आयपीएलनंतर तो कसोटीत कमबॅक करू शकतो.

2017प्रमाणे यंदाही तो आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.

पीयूष चावला - कुलदीप यादवचा फॉर्म पाहता पीयूष चावलानं टीम इंडियात कमबॅक केल्यास आश्चर्य वाटायला नको. इंडियन प्रीमिअर लीगमधील त्याची कामगिरी पुनरागमनाचे दार उघडू शकते.

2011मध्ये त्यानं भारताकडून अखेरचा वन डे, तर 2012मध्ये ट्वेंटी-20 सामना खेळला होता. पीयूषप्रमाणे मयांक मार्कंडे आणि राहुल चहर हेही शर्यतीत आहेत.