Flashback 2020 : महेंद्रसिंग धोनीची ७.२९ची धक्कादायक घोषणा अन् २०२०वर्षात निवृत्त झालेले क्रिकेटपटू!

कोरोनाच्या संकटाचा सामना करण्याच २०२० हे वर्ष सर्वांनी खर्ची घातलं... जगभरात या व्हायरसनं थैमान माजवलं आहे. याची तीव्रता कमी होताना वाटत असतानाच ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा कोरोना आढळल्यानं पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण होत आहे.

क्रीडा क्षेत्रालाही कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला... ऑलिम्पिक २०२०, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, आशिया कप यासह अनेक क्रिकेट, फुटबॉल, टेनिस लीग स्थगित कराव्या लागल्या. या अनिश्चिततेच्या छायेत अनेक क्रिकेटपटूंनी निवृत्तीचा मार्ग स्वीकारला.

२०२०मधील सर्वात धक्कादायक आणि अनपेक्षित निवृत्ती ठऱली ती महेंद्रसिंग धोनीची ( MS Dhoni)... धोनीच्या ७.२९ च्या बॉम्बनं अजूनही काही चाहते सावरलेले नाहीत. जाणून घेऊया २०२०मध्ये कोणत्या खेळाडूंनी केला क्रिकेटला रामराम...

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरूच होत्या. १५ ऑगस्ट २०२० ला सायंकाळी ७.२९ मिनिटांनी त्यानं निवृत्तीचा बॉम्ब टाकला. २००७ चा ट्वेंटी-२०, २०११चा वन डे आणि २०१३मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी या तीनही प्रमुख स्पर्धा जिंकणारा जगातला एकमेव कर्णधार म्हणून धोनी ओळखला जातो. १६ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये धोनीनं ३५० वन डेत १०७३३ धावा केल्या आहेत. ९० कसोटींमध्ये ३८.०९च्या सरासरीने ४८७६ धावा आणि ९८ ट्वेंटी-20त १६१७ धावा त्याच्या नावावर आहेत.

महेंद्रसिंग धोनीनं निवृत्ती घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच ३३ वर्षीय सुरेश रैना (Suresh Raina) यानंही निवृत्तीची घोषणा केली. १७ जुलै २०१८ साली इंग्लंडविरुद्ध रैना शेवटची वन डे खेळला होता. रैनाने १८ कसोटीत ७६८ धावा केल्या आहेत आणि यात एक शतक व ७ अर्धशतकांचा समावेश आहे. २२६ वन डे त ५६१५ धावा नावावर असून त्यात ५ शतकं आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे. ७८ ट्वेंटी-20 सामन्यांत रैनाने १६०५ धावा केल्यात.

पार्थिव पटेलनं (Parthiv Patel) ९ डिसेंबरला क्रिकेटच्या सगळ्या प्रकारातून निवृत्ती घेतली. पटेलनं १७ वर्ष आणि १५३ दिवसाचा असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. ३५ वर्षीय पार्थिवनं २५ कसोटी, ३८ वन डे आणि दोन ट्वेंटी-20त भारताचं प्रतिनिधीत्व केलं. कसोटीत त्यानं ९३४ धावा, वन डेत ७३६ धावा केल्या आहेत. 736 रन बनवले. कसोटीत त्याच्या नावावर ६२ झेल व १० स्टम्पिंग आहेत.

पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमिरनेही अचानक निवृत्ती घेऊन धक्का दिला. २८ वर्षीय गोलंदाजानं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि संघ व्यवस्थापनावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला. आमीरने ३० कसोटी त ११९ विकेट्, ६१ वन डेत ८१ आणि ५० ट्वेंटी-20त ५९ विकेट्स घेतल्या आहेत.

भारताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण यानेही जानेवारीत निवृत्ती जाहीर केली. त्यानं १२० वन डे, २९ कसोटी व २४ ट्वेंटी-20 सामने खेळला आहे. त्यानं कारकिर्दीत एकूण ३०१ विकेट्स घेतल्या आहेत. तर १ शतक व ११ अर्धशतकांसह २८२१ धावा केल्या आहेत.