Flashback 2020 : MS Dhoni पर्वाचा शेवट; ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेतील ऐतिहासिक जेतेपद अन् बरंच काही!

क्रीडा क्षेत्रालाही कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला... ऑलिम्पिक २०२०, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, आशिया कप यासह अनेक क्रिकेट, फुटबॉल, टेनिस लीग स्थगित कराव्या लागल्या. पण, वाईट गोष्टींसोबतही यंदाच्या वर्षात काही चांगल्या गोष्टीही घडल्या. चला तर जाणून घेऊया २०२०मधील फ्लॅशबॅक...

पाच खेलरत्न - भारतीय क्रीडा इतिहासात पहिल्यांदाच एकाचवेळी पाच खेळाडूंना सर्वोच्च खेलरत्न पुरस्कार देण्यात आला. यामध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला हॉकीपटू राणी रामपाल, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा व पॅराअॅथलिट मरिअप्पन थांगवेलू यांचा समावेश आहे.

कोरोनामुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा रद्द करण्यात आली. आता २०२१मध्ये भारतात ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होईल आणि २०२२च्या वर्ल्ड कपचा मान पुन्हा ऑस्ट्रेलियाला मिळाला आहे. भारतीय महिला संघाचे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न थोडक्यात हुकले. भारताला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ८५ धावांनी पराभव पत्करावा लागला.

क्रिकेट - कोरोनाचे सावट राहिलेल्या यंदाच्या वर्षात भारतीय संघानं जानेवारीपासून आतापर्यंत श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध मालिका खेळली. भारतानं ११ ट्वेंटी-20 सामन्यांत ९ विजय मिळवले, १ पराभव झाला, तर १ सामना अनिर्णित राहिला. ९ वन डेपैकी भारताला ४ विजय मिळवता आले, तर ५ सामने गमावले. न्यूझीलंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियानं कसोटीतील अव्वल स्थआनही गमावले.

टेनिस - कोरोनामुळे फ्रेंच ओपन स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पार पडली. राफेल नदालनं अपेक्षित कामगिरी करताना जेतेपद पटकावले. त्याचे हे २०वे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले.

बुद्धिबळ - ऑगस्टमध्ये ऑनलाईन ऑलिम्पियाड स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत भारतीय संघाने प्रथमच जेतेपद पटकावले. सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यानं भारत आणि रशिया यांना संयुक्त जेतेपद देण्यात आले. कोरोनामुळे प्रथमच ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीनं झाली होती. विश्वनाथन आनंदसारख्या अनुभवी आणि दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचा युवा खेळाडू विदित गुजराथीनं केलं होतं.

बॅटमिंटन - जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या 'I Am Badminton' या जनजागृती मोहिमेसाठी स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधूची एप्रिलमध्ये सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली. मार्चमध्ये अत्यंत प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेत भारतीयांच्या पदरी निराशा आली.

विम्बल्डन - कोरोनामुळे क्रीडाविश्वातील सर्वात प्रतिष्ठेच्या स्पर्धांपैकी एक असलेली विम्बल्डन टेनिस स्पर्धा रद्द झाली. केवळ दुसऱ्या महायुद्धाच्या काळातच ही स्पर्धा रद्द झाली होती आणि त्यानंतर पहिल्यांदाच स्पर्धा रद्द करण्याची नामुष्की ओढावली.

आयपीएल २०२०; मुंबई जिंकली - यंदाच्या वर्षात कोरोनामुळे संपूर्ण क्रीडाविश्व थांबले. याचा फटका आयपीएललाही बसला. दरवर्षी मार्च-मे दरम्यान रंगणारी ही स्पर्धा यंदा सप्टेंबर-नोव्हेंबर यादरम्यान रंगली. यंदा मुंबई इंडियन्सने विक्रमी पाचवे जेतेपद पटकावताना आपल्या जेतेपदाचा बचावही केला.

धोनी, रैना यांची निवृत्ती - १५ ऑगस्ट रोजी दिवसभर स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजरा केल्यानंतर सर्व भारतीयांना हा दिवस संध्याकाळी चटका लावून गेला तो दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीमुळे. धोनीपाठोपाठ काही मिनिटांनीच स्टार क्रिकेटपटू सुरेश रैनानेही निवृत्ती घेतली.

हॉकीची कर्णधार राणी रामपाल पुरस्काराने सन्मानित - भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिला ‘वर्ल्ड गेम्स ॲथलिट ऑफ द इयर’ या पुरस्काराने जानेवारीत सन्मानित करण्यात आले. अशा प्रकारचा पुरस्कार मिळवणारी राणी ही पहिलीच भारतीय हॉकीपटू ठरली आहे. जनमतातून हा पुरस्कार प्राप्त होतो. राणीला ७ लाखांपैकी २ लाख मते मिळाली.

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन - चित्त्याची चपळाई, आक्रमक कुस्तीच्या जोरावर उत्तरेतील प्रसिद्ध मल्ल रुस्तम-ए-पंजाब बत्तासिंग याला चितपट करून भारताचे पहिले हिंदकेसरी बनलेले श्रीपती शंकर खंचनाळे (वय ८६, रा. रुईकर कॉलनी, कोल्हापूर) यांचे वृद्धापकाळाने उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले.