Fact Check : किरॉन पोलार्डच्या गाडीचा भीषण अपघात; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूच्या निधनाची चर्चा

ट्वेंटी-20 क्रिकेटमधील स्टार फलंदाज किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) याच्याशी निगडीत कोणतीही बातमी हवा करून जाते. मग मैदानावरील त्याची स्फोटक खेळी असो किंवा अन्य कोणतीही...

गेली अनेक वर्ष मुंबई इंडियन्सचा सदस्य असलेल्या पोलार्डचा भारतातही मोठा चाहता वर्ग आहे. गतवर्षी यूएईत पार पडलेल्या इंडियन प्रीमिअर लिगच्या ( IPL 2020) १३ व्या पर्वात मुंबई इंडियन्सला जेतेपद जिंकून देण्यात पोलार्डचा मोठा वाटा होता. त्यानं २-३ सामने तर प्रतिस्पर्धी संघाच्या हातचे हिरावून आणले.

पोलार्ड जगभरातील ट्वेंटी-20 लीगमध्ये विविध संघांचे प्रतिनिधित्व करतो. त्यानं ५३१ ट्वेंटी-20 सामन्यांत १०५७८ धावा केल्या आहेत. ख्रिस गेल ( १३५८४) याच्यानंतर ट्वेंटी-20 सर्वाधिक धावा करण्याचा मान पोलार्डला जातो.

मुंबई इंडियन्सकडून १५० सामने खेळणारा तो पहिलाच खेळाडू आहे. आयपीएलमध्ये त्यानं १६४ सामन्यांत ३०२३ धावा चोपल्या आहेत आणि ६० विकेट्सही घेतल्या आहेत.

सोशल मीडियावर शुक्रवारी दिवसभर पोलार्डच्या मृत्यूची चर्चा रंगली होती. गाडीच्या भीषण अपघातात पोलार्डचा मृत्यू झाल्याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि त्यामुळे चाहत्यांनीही दुःख व्यक्त केले.

वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) याच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची चर्चा काल दिवसभर सोशल मीडियावर रंगली. या अपघातात पोलार्डला आपले प्राण गमवावे लागले असल्याचा दावाही अनेकांनी केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही चर्चा चुकीची असून अपघात झालेल्या गाडीचा आणि पोलार्डचा काहीच संबंध नाही. ही सर्व अफवा आहे.

विंडीजचा अष्टपैलू खेळाडू सध्या यूएईल T10 लीगसाठी दाखल झाला आहे. त्याच्या अपघाती मृत्यूची बातमी जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तेव्हा पोलार्ड डेक्कन ग्लॅडिएटर संघाकडून पुणे डेव्हिल्सविरुद्ध मैदानावर उतरला होता.

पोलार्डच्या ग्लॅडिएटर संघानं हा सामना ७ विकेट्स राखून जिंकला. अशा एखाद्या खेळाडूच्या मृत्यूची बातमी प्रथमच सोशल मीडियावर रंगली नाही. यापूर्वीही भारताचा स्टार अष्टपैलू सुरेश रैना याच्या मृत्यूची अफवा पसरली होती.

Read in English