भारताच्या 17 वर्षीय शेफाली वर्मानं इंग्लंडमध्ये इतिहास रचला; सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांच्याशी केली बरोबरी!

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला असताना दुसरीकडे ब्रिस्टॉल येथे भारतीय महिला संघाच्या 17 वर्षीय शेफाली वर्मानं ( Shafali Verma) ऐतिहासिक कामगिरी केली. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात शेफालीनं दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करून थेट सुनील गावस्कर व सचिन तेंडुलकर या महान खेळाडूंच्या पंक्तित स्थान पटकावलं.

7 वर्षानंतर पहिली कसोटी खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने 17 वर्षीय शेफाली वर्मासह पाच खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. शेफाली व स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी केली, परंतु या दोघी माघारी परतल्यानंतर संघाचा डाव 231 धावांवर गडगडला अन् भारतीय महिलांवर फॉलोऑनची नामुष्की ओढावली. महिला कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी 100+ धावांची भागीदारी होऊनही संपूर्ण संघ 231 धावाच करण्याची ही सर्वांत निचांक कामगिरी ठरली.

इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 396 धावांवर पहिला डाव घोषित केला. प्रत्युत्तरात शेफाली व स्मृती यांनी अर्धशतकी खेळी करताना संघाला दमदार सुरूवात करून दिली. शेफालीचे पदार्पणातील शतक 4 धावांसाठी हुकले. तिनं 152 चेंडूंत 13 चौकार व 2 षटकारांसह 96 धावा केल्या. स्मृतीनं 155 चेंडूंत 14 चौकारांसह 78 धावा केल्या. 167 धावांवर भारतानं पहिली विकेट गमावली अन् त्यानंतर 64 धावांत संघाचा डाव गडगडला. भारतावर फॉलोऑनची नामुष्की ओढावली. दीप्ती शर्मानं 29 धावांचं योगदान दिलं. इंग्लंडच्या सोफी एस्क्लेस्टननं 4 विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या डावात स्मृती 8 धावांवर बाद झाली. दीप्ती शर्माला तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली अन् तिनं शेफालीसह टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली, परंतु पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. शेफालीनं सलग दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले आणि पदार्पणात दोन्ही डावांत अर्धशतक झळकावणारी ती पहिली भारतीय, तर जगातील चौथी महिला खेळाडू ठरली.

कसोटीच्या दोन्ही डावांत 50+ धावा करणारी सचिन तेंडुलकरनंतर दुसरी युवा फलंदाज ठरली. सचिननं 17 वर्ष व 112 दिवसांचा असताना कसोटीच्या दोन्ही डावांत 50+ धावा केल्या होत्या. शेफालीनं 17 वर्षे व 141 दिवसांची असताना हा पराक्रम केला. ( Youngest Indians to hit 50+ in both Test innings: age taken for second fifty))

आतापर्यंत पदार्पणाच्या कसोटीत दोन्ही डावांत 50+ धावा करणाऱ्या भारतीय सलामीवीरांमध्ये सुनील गावस्करच यशस्वी झाले होते. त्यानंतर आता शेफालीनं याही पंक्तित तिचं नाव समाविष्ठ करून घेतलं आहे. ( Only Two Indian Openers Scored 50s in both Innings of a Debut Test)

1986 साली गार्जी बॅनर्जी यांनी कसोटीच्या दोन्ही डावांत 50+ धावा केल्या होत्या.