"धोनीला कर्णधारपद मिळालं अन् त्यांची कामगिरी उंचावत गेली, पण..."

जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमुळे सर्व क्रीडा स्पर्धा ठप्प असून खेळाडू घरात आहेत. तसेच, अनेक समालोचक सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धा नसल्याने घरात आहेत.

दरम्यान, समालोचक आकाश चोप्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू रूद्र प्रताप सिंग अर्थात आर. पी. सिंग याच्याशी लाईव्ह संवाद साधला.

यावेळी आर. पी. सिंगने समालोचक आकाश चोप्रासोबत लाइव्ह चॅटच्या माध्यमातून आपली महेंद्रसिंग धोनीशी असलेली मैत्री आणि इतर गोष्टींबाबत माहिती दिली.

यावेळी आर. पी. सिंग म्हणाला, "आम्ही सुरूवातीच्या काळात अनेक वेळा एकत्र वेळ घालवायचो आणि खूप गप्पा मारायचो. त्यानंतर त्याला कर्णधारपद मिळाले आणि त्याची कामगिरी उंचावत गेली. पण माझ्या कामगिरीत मी सातत्य राखू शकलो नाही."

असे असले तरी आमची मैत्री अजूनही तशीच घट्ट आहे. आम्ही अजूनही एकत्र असलो की गप्पा मारतो. फक्त क्रिकेटबाबत आमची मत काहीशी वेगळी आहेत, असे आर. पी. सिंगने सांगितले.

दरम्यान, आर. पी. सिंगने कारकिर्दीत चांगली सुरूवात केली होती. त्याने १४ कसोटी, ५८ एकदिवसीय आणि १० टी २० सामने खेळले.

भारताचे प्रतिनिधित्व करताना त्याने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी २० विश्वचषक २००७ मध्ये दमदार कामगिरी केली होती.