पहिल्या विकेटसाठी चार फलंदाजांची ४०८ धावांची भागीदारी, चौघांचेही शतक; क्रिकेटच्या इतिहासातील अजुबा!

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हे खरं आहे... हे सिद्ध करण्यासाठी अनेक उदाहरणं देता येतील. पण, भारतीय संघानं दिलेल्या प्रचितीनं सर्वांनाच धक्का बसला. कसोटी क्रिकेट सामन्याचा पहिला डाव, पहिली विकेट, चार फलंदाज आणि चौघांचेही शतक... हे असे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले.

पहिल्या विकेटसाठी ४००+धावांची भागीदारी झाली आणि ती दोन फलंदाजांनी नव्हे तर चार फलंदाजांनी मिळून केली. आता तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की पहिल्या विकेटसाठी चार फलंदाज कसे मैदानावर उतरले, तर भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे घडले आहे.

आजच्याच दिवशी पण १४ वर्षांपूर्वी ढाका येथे हा अजब रिकॉर्ड नोंदवला गेला. जिथे चार फलंदाजांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ४०८ धावांची भागीदारी केली. २५ मे २००७ रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिकेचा दुसरा सामना ढाका येथे झाला आणि तेथेच चार फलंदाजांनी शतकं झळकावली.

भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याला विश्रांती देण्यात आली होती आणि दिनेश कार्तिक सलामीला आला होता. वासिम जाफर हा तेव्हा भारताच्या कसोटी संघाचा नियमित सलामीवीर होता. पण, या सामन्यात जे झाले ते अनियमित होते.

दिनेश कार्तिक व वासिम जाफर यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी यजमानांच्या गोलंदाजांना दमवलं. या दोघांनी १७५ धावांची भागीदारी केली, परंतु कार्तिक रिटायर्ड हर्ट झाला अन् माघारी परतला. तो शतकाच्या जवळच होता.

त्यानंतर राहुल द्रविड मैदानावर आला. राहुल व जाफर यांनी टीम इंडियाची धावसंख्या २८१ धावांपर्यंत पोहोचवली आणि जाफरनं शतक पूर्ण केले. तो १३८ धावा करून रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला.

फलकावर २८१ धावा असताना भारतानं एकही विकेट गमावली नव्हती आणि खेळपट्टीवर द्रविड व सचिन तेंडुलकर ही जोडी होती. या जोडीनं भारताला दुसऱ्या दिवशी ४००+ धावांच्या वर मजल मारून दिली. द्रविडनेही शतक पूर्ण केलं.

भारतानं एकही विकेट न गमावता पहिल्या विकेटसाठी ४०८ धावा केल्या होत्या आणि ४१३ धावांचा विक्रम मोडण्याच्या नजीक होते. पण, द्रविड १२९ धावांवर बाद झाला अन् भारतानं ४०८ धावांवर पहिली विकेट गमावली.

द्रविड बाद झाल्यानंतर कार्तिकनं मैदानावर येऊन त्याचे शतक पूर्ण केले. तो १२९ धावांवर बाद झाला. तेंडुलकरनंही ( १२२) शतक पूर्ण केलं.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच पहिल्या विकेटसाठी चार फलंदाजांनी शतकी खेळी केली. त्यानंतर २०१९मध्ये पाकिस्तानच्या आघाडीच्या चार फलंदाजांनी श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावण्याचा पराक्रम केला.

भारतनं पहिल्या डावात ३ बाद ६१० धावा केल्या आणि बांगलादेशला दोन्ही डावांत हे लक्ष्य पार करता आले नाही. भारतानं हा सामना एक डाव व २३९ धावांनी जिंकला.