Corona Virus : IPL चॅम्पियन संघाची कोट्यवधींची मदत; अन्य संघ घेणार का आदर्श?

जगभरात थैमान माजवणाऱ्या कोरोना व्हायरसला आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्याचे निर्णयही घेण्यात आले आहेत.

आतापर्यंत कोरोनामुळे जगभरातील मृतांचा आकडा 90 हजारांच्या घरात गेला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 5000 वर गेली असून 166 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमावरही अनिश्चिततेचं सावट आहे.

29 मार्चपासून सुरू होणारी ही लीग 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

15 एप्रिलनंतरही ही स्पर्धा होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यासाठी अनेक पर्यायांचा विचार सुरू आहे.

आयपीएल न झाल्यास बीसीसीआय आणि फ्रँचायझींना मोठा आर्थिक नुकसान होणार आहे. पण, काही फ्रँचायझींनी हे नुकसान सोसण्याची तयारी दर्शवली आहे.

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी अनेक खेळाडूही पुढे आले आहेत. रोहित शर्मा, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी आपापल्या परीनं मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

आता कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आयपीएलचा माजी विजेता संघ पुढे आला आहे. त्यांनी कोरोना सहाय्यता निधीत 10 कोटींची मदत केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर कर्णधार असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघानं हा पुढाकार घेतला आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघानं 2016मध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला नमवून आयपीएल जेतेपद पटकावले होते.