टीम इंडिया अन् झिम्बाब्वे यांनी मिळून १३२ वर्षानंतर कसोटीत केला पराक्रम; जाणून घ्या काय आहे हा विक्रम

132 years ago कसोटी क्रिकेट पाच दिवसांऐवजी दोन दिवसांचा करावा का, असा विचार सुरू करण्यास हरकत नाही. त्याला कारणही तसेच आहे. भारतानं अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा डाव अवघ्या दोन दिवसांत गुंडाळला आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.

झिम्बाब्वे संघानंही दुबईत खेळवण्यात आलेली अफगाणिस्तान विरुद्धची कसोटी लढत दोन दिवसांत जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. लालचंद राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली झिम्बाब्वेनं हा सामना १० विकेट्स राखून जिंकला.

झिम्बाब्वेच्या या विजयानं टीम इंडियानं संयुक्तपणे कसोटीच्या १३२ वर्षांच्या इतिहासातील वेगळा विक्रम नावावर केला.

अफगाणिस्तानचा पहिला डाव १३१ धावांवर गुंडाळण्यात झिम्बाब्वेला यश आलं. ब्लेसिंग मुझाराबानी ( ४ विकेट्स), विक्टर एनयाऊची ( ३ ) यांनी अफगाणिस्तानचे कंबरडे मोडले.

प्रत्युत्तरात झिम्बाब्वेनं पहिल्या डावात २५० धावा केल्या. कर्णधार सिन विलियम्सनं १०५ धावांची खेळी केली.

दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानच्या फलंदाजांना फार कमाल दाखवता आली नाही. इब्राहिम झाद्रान ( ७६) वगळता अन्य फलंदाजांनी नांग्या टाकल्या.

विक्टर एनयाऊची व डोनाल्ड तिरीपानो यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. ब्लेसिंगनं २ विकेट्स घेतल्या आणि अफगाणिस्तानचा दुसरा डाव १३५ धावांवर गडगडला.

झिम्बाब्वेनं १७ धावांचे माफक लक्ष्य ३.२ षटकांत पार करत विजय मिळवला. दोन दिवसांत कसोटीचा निकाल लागला.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सलग दोन कसोटींचा निकाल दोन दिवसांत लागण्याची ही १३२ वर्षांनंतरची पहिलीच वेळ ठरली. यापूर्वी १८८९मध्ये दक्षिण आफ्रिका-इंग्लंड यांच्यातील सलग दोन कसोटी सामने दोन दिवसांत संपले होते.

२००२नंतर प्रथमच आशियाई खंडात बाहेरच्या संघाला दोन दिवसांत कसोटी जिंकता आली. यापूर्वी ऑस्ट्रेलियानं शारजाह येथे पाकिस्तानवर असा विजय मिळवला होता.

१८८२ ते १८९६ या कालावधीत ९ सामने दोन दिवसांत संपले. त्यानंतर १९१२ ते १९४६ या काळात दोन दिवसांत कसोटीचा निकाल लागणाऱ्या सामन्यांची संख्या ६ होती, तर २००० ते २०२१ या कालावधीत ती संख्या ८ झालीय.