शास्त्रीनंतर टीम इंडियात कॅप्टन कोहली नव्हे, तर ही व्यक्ती दुसऱ्या स्थानी

भारतीय संघात मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांचीच चलती आहे. त्यामुळेच वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतरही शास्त्री यांची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा वर्णी लागली. टीम इंडियात शास्त्री अव्वल स्थानी आहेत, तर दुसऱ्या स्थानी नक्कीच कोहली असेल अशी खात्री आहे. पण, संघातील दुसरे स्थान कोहलीला नाही तर दुसऱ्याच व्यक्तीला मिळाले आहे.

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकापदासह सपोर्टींग स्टाफचीही नुकतीच घोषणा करण्यात आली. फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर याची उचलबांगडी करण्यात आली. बांगरच्या उचलबांगडीनंतर संघातील सहाय्यक प्रशिक्षकाचे स्थानही रिक्त झाले आहे. गोलंदाजी प्रशिक्षकपदी भरत अरुण यांची फेरनिवड झाली.

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील माजी खेळाडू भरत अरुण यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने गोलंदाजीत बरीच सुधारणा केली. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर संघाशी जोडलेल्या अरुण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय गोलंदाजांनी परदेशात सलग 20 विकेट घेण्याचा पराक्रम केला. त्यामुळेच त्यांना पुन्हा संधी देण्यात आली.

आता अरुण यांच्याकडे नवीन जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. संघाचे सहाय्यक प्रशिक्षकपद अरुण यांना देण्यात येईल अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे संघात अरुण यांना शास्त्रीनंतर दुसरे स्थान मिळणार आहे.

बांगरच्या जागी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून विक्रम राठोड यांची निवड केली.