#Best Of 2018 : विराट खेळला, विक्रम झाला... 2018 मध्ये 'क्रिकेटचा किंग' ठरला कॅप्टन कोहली!

भारताचा कर्णधार विराट कोहलीने 2018या वर्षाचा निरोप शुन्य धावाने घेतला. पण, 2018 हे वर्ष विराटमय विक्रमांचे वर्ष ठरले. त्याच्या बॅटीतून धावांचा धबधबा ओसंडून वाहत राहिला आणि त्यातूनचे अनेक विक्रम मोडले गेले. ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवून 2018चा आनंदाने निरोप घेण्याचा त्याचा मानस असेल, परंतु त्याने सरत्या वर्षात क्रिकेट चाहत्यांना भरभरून दिले.

2017 प्रमाणे यंदाही सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा भारतीय फलंदाज विराट कोहलीच ठरला. त्याने यंदा 2735 धावा केल्या आहेत. 2017 मध्ये त्याने 2818 धावा केल्या होत्या.

कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या विक्रमाने कोहलीला हुलकावणी दिली आहे. हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर ( 12) आहे. मात्र, कोहलीने 2018 मध्ये 11 शतकं ठोकली आणि 2017च्या स्वतःच्या व 2003 च्या रिकी पाँटिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली.

सलग तीन वन डे सामन्यांत शतक करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याने हा पराक्रम केला.

विंडीजविरुद्धच्या मालिकेतच त्याने सर्वाधिक जलद 10000 वन डे धावा करण्याचा विक्रम नावावर केला. त्याने 205 डावांमध्ये हा पल्ला गाठून सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेला विक्रम मोडला.

दहा हजार धावांचा पल्ला पार करणारा तो एकूण 13 वा आणि पाचवा भारतीय फलंदाज ठरला. सचिन तेंडुलकर ( 18426), सौरव गांगुली ( 11221) आणि राहुल द्रविड ( 10768) या दिग्गजांच्या पंगतीत त्याने स्थान पटकावले.

त्याने सहा कॅलेंडर वर्षांत वन डेत 1000 धावा करण्याचा पराक्रम करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. त्याने 2011, 2012, 2013, 2014, 2017 आणि 2018 या वर्षांत ही कामगिरी केली.

2018 मध्ये त्याने 11 डावांत 1000 वन डे धावा केल्या आणि हाशिम आमला ( 15 डाव) याच्या नावावर असलेला जलद 1000 धावांचा विक्रम मोडला.

कोहलीने ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा पराक्रमही गाजवला.