IPL 2020 न झाल्यास भारतीय खेळाडूंना बसेल मोठा धक्का? सौरव गांगुलीनं दिले संकेत

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगवर अनिश्चिततेचं सावट आहे. यंदा आयपीएल न झाल्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) जवळपास 4000 कोटींचा नुकसान सहन करावा लागेल.

त्यामुळे बीसीसीआय किमान काही सामने खेळवण्यासाठी प्रयत्नशील आहे, परंतु त्याबाबत अजूनही स्पष्टता नाही. आयपीएल स्पर्धा रद्द करावी लागल्यास त्याचा भारतीय खेळाडूंनाही मोठा फटका बसू शकतो.

आयपीएल न झाल्यास खेळाडूंच्या पगारात कपात करण्याचे संकेत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले.

''आम्ही आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करत आहोत. आमच्याकडे किती पैसे आहेत, ते पाहून निर्णय घेतला जाईल. इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) न झाल्यास बीसीसीआयला 4000 कोटींचं नुकसान होईल. आयपीएल झाल्यास खेळाडूंच्या पगारावर कात्री लागणार नाही. आम्ही सर्व परस्थिती योग्य रितीनं हाताळू,'' असं गांगुलीनं सांगितलं.

सध्या लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे आणि तो पुढेही कायम राहण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.

17 मे नंतर काही नियमांत शिथिलता होईल, असेही संकेत मिळाले असल्यानं बीसीसीआयचे त्याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे आयपीएलचे सामने प्रेक्षकांविना खेळवण्याची बीसीसीआयची तयारी आहे.

सध्याच्या ग्रेड नुसार A+ग्रेडमधील खेळाडूंना प्रतीवर्ष 7 कोटी, A, B आणि C ग्रेडमधील खेळाडूंना अनुक्रमे 5, 3 व 1 कोटी पगार दिला जातो.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे A+ ग्रेडमध्ये येतात.

कसोटी किंवा ट्वेंटी-20 व वन डे संघातील नियमित सदस्य A ग्रेडमध्ये, तीनपैकी एका फॉरमॅटमधील नियमित सदस्य B ग्रेडमध्ये, तर नवीन खेळाडूंचा C ग्रेडमध्ये समावेश आहे.

महिला क्रिकेटपटूंना A ग्रेडसाठी 50 लाख, तर B व C ग्रेडमधील खेळाडूंना अनुक्रमे 30 व 10 लाख दिले जातात.

Read in English