T20 World Cup 2021 नंतर टीम इंडिया नेमकं काय करणार? BCCI चा जबरदस्त प्लान तयार!

टी-२० वर्ल्डकपनंतर भारताच्या टी-२० संघाचं नेतृत्त्व सोडणार असल्याचं कोहलीनं जाहीर केलंय. पण बीसीसीआयनंही त्यानंतरचा संपूर्ण प्लान तयार केलाय. जाणून घेऊयात...

T20 World Cup 2021: भारतीय संघ १४ नोव्हेंबरपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) होत असलेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात आणखी एक टी-२० वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जाणार आहे. या वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) तयारीला सुरुवात केली आहे.

भारतीय संघातील खेळाडूंना जास्तीत जास्त टी-२० सामन्यांचा सराव देण्यासाठी बीसीसीआयनं मेगा प्लान आखला आहे. पुढील वर्षभरात भारतीय संघाच्या नियोजित दौऱ्यांमध्ये टी-२० सामन्यांना जास्तीत जास्त भरणा असणार आहे.

टी-२० वर्ल्डकप स्पर्धा संपल्यानंतर बीसीसीआयनं भारतीय संघाच्या आंतरराष्ट्रीय मालिकांचं नियोजन केलं आहे. यात न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ खेळणार आहे. या दौऱ्यांमध्ये जास्तीत जास्त टी-२० सामन्यांचा समावेश असणार आहे.

एका हिंदी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयची नुकतीच एक ऑनलाइन बैठक पार पडली. यात भारतीय संघाच्या आगामी मालिकांबाबतचा निर्णय घेण्यात आला. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-२०, दोन कसोटी सामने खेळणार आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध तीन वनडे आणि तीन टी-२० सामने खेळविण्यात येणार आहेत. श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी आणि तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे.

भारतात तब्बल २१ आंतरराष्ट्रीय सामने निर्धारित करण्यात आलेल्या नियोजनानुसार भारत आगामी काळात देशांतर्गत तब्बल २१ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. यात १४ टी-२० सामन्यांचा समावेश असणार आहे. तर तीन वनडे आणि चार कसोटी सामन्यांचा समावेश आहे.

भारतानं यंदाच्या वर्षात फेब्रुवारी-मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध मालिका खेळली होती. त्यानंतर आयपीएलला सुरुवात झाली होती. पण कोरोना प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा अर्ध्यावरच स्थगित करावी लागली होती. आता उर्वरित सामने आजपासून यूएईमध्ये खेळवले जात आहेत.

टी-२० वर्ल्डकपचं यजमानपद भारताकडे होतं. पण देशात कोरोना प्रादुर्भावामुळे वर्ल्डकप स्पर्धा यूएईमध्ये खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टी-२० वर्ल्डकपनंतर न्यूझीलंडचा संघ नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. यात भारत टी-२० आणि वनडे मालिका खेळणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात या मालिकेचं आयोजन केलं जाणार आहे.

आफ्रिकेतून परतल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर श्रीलंका देखील भारत दौऱ्यावर येणार आहे. १८ मार्च रोजी हे दोन्ही दौरं संपणार आहेत. त्यानंतर एप्रिल-मे महिन्यात आयपीएलचं आयोजन होणार आहे.