BAN vs WI, 1st Test : पाहुणे जोमात, यजमान कोमात; कायले मेयर्सनं मोडला ६२ वर्षांपूर्वीचा भारतीय दिग्गजाचा विक्रम

इंग्लंड संघानं चेन्नई कसोटीत यजमान भारताची अवस्था बिकट केली आहे. पहिल्या डावातील ५७८ धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाचे ४ फलंदाज ७४ धावांवर माघारी परतले आहेत. रिषभ पंतनं आक्रमक खेळ करताना टीम इंडियाची लाज वाचवण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे.

चेन्नईत पाहुण्या इंग्लंडचा दमदार खेळ सुरू असताना बांगलादेशमध्येही अतिथी वेस्ट इंडिजच्या फलंदाजानं दमदार खेळ केला आहे. ३९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतान विंडीजच्या पदार्पणवीर कायले मेयर्स ( Kyle Mayers) शतकी खेळी केली. त्यानं एनकृमाह बोन्नरसोबत विक्रमी कामगिरी केली.

बांगलादेशच्या पहिल्या डावातील ४३० धावांच्या उत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव २५९ धावांवर गडगडला. दुसऱ्या डावात बांगलादेशनं ८ बाद २२३ धावांवर डाव घोषित करून विंडीजसमोर ३९५ धावांचे लक्ष्य ठेवले. कर्णधार मोमिनूल हकनं ११५ धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे १०वे शतक ठरले.

३९५ धावांचा पाठलाग करताना विंडीजचे आघाडीचे तीन फलंदाज ५९ धावांवर माघारी परतल्यानंतर बांगलादेशच्या चमूत विजयाचा विश्वास निर्माण झाला. पण, कायले मेयर्स व बोन्नेर यांनी सामना रोमहर्षक बनवला. मेयर्स २१३ चेंडूंत १३ चौकार व १ षटकारासह ११७ धावांवर खेळतोय, तर बोन्नेर ७९ धावांवर आहे.

कायले मेयर्सचा हा पहिलाच कसोटी सामना आहे आणि त्यानं शतकी खेळून विक्रमाला गवसणी घातली. ४०० धावांच्या लक्ष्यापर्यंचा पाठलाग करताना पदार्पणात चौथ्या डावात शतक करणारा मेयर्स हा चौथा फलंदाज आहे. पण, मेयर्सनं आजच्या सामन्यात १९५९साली नोंदवलेला विक्रम मोडला.

कसोटी पदार्पणात चौथ्या डावातील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी हा विक्रम भारताच्या अब्बास अली बैग यांच्या नावावर होता. त्यांनी १९५९मध्ये इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर कसोटीत ११२ धावा केल्या होत्या. २०१२मध्ये फॅफ ड्यू प्लेसिसनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ११० धावा केल्या होत्या.

मेयर्स व बोन्नेर यांनी आशिया खंडात चौथ्या डावात वेस्ट इंडिजकडून कोणत्याही विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारीची नोंद केली. या दोघांनी द्विशतकी भागीदारी केली आहे. यापूर्वी १९७५मध्ये बैचॅन व क्लाईव्ह लॉईड यांनी चौथ्या विकेटसाठी पाकिस्तानविरुद्ध १६४ धावा जोडल्या होत्या.

मेयर्स व बोन्नेर यांची भागादारी २१६ धावांवर संपुष्टात आली. बोन्नेर ८६ धावांवर माघारी परतला. विंडीजला ३२ षटकांत विजयासाठी १२० धावांची गरज आहे आणि त्यांच्या हातात सहा विकेट्स आहेत.