India vs England, 1st Test : Bad News; सामना सुरू होण्याआधीच टीम इंडियाला धक्का, दुखापतीमुळे खेळाडूची माघार

भारत विरुद्ध इंग्लंड ( India vs England) कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला आजपासून सुरूवात होत आहे. पण, या सामन्याला सुरूवात व्हायच्या एक तास आधी BCCIचा मेल धडकला अन् क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी मिळाली.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मानगुटीवर बसलेलं दुखापतीचं ग्रहण याही मालिकेत कायम आहे की काय, अशी शंका उपस्थित झाली आहे. चेन्नईतील या पहिल्या कसोटीपूर्वी टीम इंडियाच्या गोलंदाजानं दुखापतीमुळे माघार घेतली आहे.

BCCIनं तसे ट्विट केले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, आर अश्विन, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी ही अशी दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढतच गेली होती. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही हे सावट कायम असल्याची भीती आहे.

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. कोरोनाच्या नियमांमुळे या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईत खेळवले जाणार आहेत.

या कसोटी मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. या दोघांमध्ये होणाऱ्या लढतीत जो कुणी बाजी मारेल. त्याचा संघ कसोटी मालिकेत वरचढ ठरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

घरच्या मैदानांवर इंग्लंडविरोधात कोहलीची कामगिरीच चांगली झालेली आहे. त्याने नऊ कसोटी सामन्यांमध्ये ८४३ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये ३ शतकांचाही समावेश आहे.

पण, दुखापतीमुळे टीम इंडियाला धक्का बसला आहे. आजच्या सामन्यात पदार्पणासाठी सज्ज असलेला फिरकी गोलंदाज अक्षर पटेल ( Axar Patel) यानं गुडघे दुखीमुळे पहिल्या कसोटीतून माघार घेतली आहे. त्याच्याजागी शाहबाझ नदीम व राहुल चहर या दोन फिरकी गोलंदाजांचा संघात समावेश केला गेला आहे, अशी माहिती BCCIनं दिली.

''इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून अक्षर पटेलनं माघार घेतली आहे. अष्टपैलू खेळाडूनं त्याच्या डाव्या गुडघ्यात त्रास होत असल्याचे सांगितले. सराव सत्रात त्यानं ही माहिती दिली. त्वरितच BCCIच्या वैद्यकिय टीमनं त्याची चाचणी केली आणि त्याचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. पण, अक्षर पहिल्या कसोटीत खेळणार नाही,''असे बीसीसीआयनं सांगितलं.

बीसीसीआयनं म्हटलं की,''निवड समितीनं त्याच्या जागी संघात शाहबाझ नदीम व राहुल चहर यांचा समावेश केलेला आहे. हे दोघंही टीम इंडियासोबत चेन्नईत सराव करत होते आणि राखीव खेळाडूंमध्ये त्यांचा समावेश होता.''