वडिलांचा होता पानाचा ठेला, घरी अठराविश्व दारिद्र्य अन् आज टीम इंडियासोबत करतोय इंग्लंड दौरा!

भारताचा युवा गोलंदाज आवेश खान यानं आयपीएलच्या यंदाच्या पर्वात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दिल्ली कॅपिटल्सच्या या खेळाडूची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. जाणून घेऊयात...

आवेश खान यानं यंदाच्या आयपीएलमध्ये ७ सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेतल्या होत्या. ज्या संघात इशांत शर्मा, उमेश यादव, नॉर्खिया यांच्यासारख्या दिग्गज गोलंदाजांचा समावेश असताना आवेश खान याला संघानं महत्व आणि विश्वास दाखवून संधी दिली. आवेश खान यानं संधीचं सोनं करुन स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं.

आवेश खान याचा आजवरचा प्रवास मात्र खूप खडतर राहिला आहे. जे लोक एकेकाळी तू क्रिकेटमध्ये काहीच करू शकत नाहीस असं म्हणायचे आज तेच लोक मला मेसेज करुन अभिनंदन करत आहेत, असं आवेश खान सांगतो.

आवेश खान एका सर्वसामान्य कुटुंबाचं प्रतिनिधित्व करतो. त्याच्या वडिलांचा इंदौर येथे पानाचा ठेला होता. आवेश तेव्हा १४ वर्षांचा होता तेव्हा एका रस्त्याचं काम सुरू असताना त्याच्या वडिलांचा ठेला तोडून टाकण्यात आला होता. त्यामुळे पुढची दोन वर्ष कुटुंबियांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं.

घरात एक वेळचं जेवण मिळणंही खूप कठीण झालं होतं. अशावेळी आवेश खान यानं ठरवलं की आयुष्यात काहीतरी मोठं करायला हवं. त्याला क्रिकेटची खूप आवड होती आणि त्यात मेहनत करण्याचं आवेशनं ठरवलं.

आवेश खान यांनं खूप मेहनत करुन गोलंदाजीत सुधारणा करत अंडर-१९ संघात जागा मिळवली आणि मग मागे वळून पाहिलं नाही. आवेश खान याच्या गोलंदाजीला वेग होता पण त्यात व्हेरिएशन नव्हतं. त्यानं त्यावर भर द्यायचं ठरवलं आणि नेट्समध्ये खूप घाम गाळला.

आवेश खाननं अनेक महिने स्लोलर गोलंदाजी करण्याचा सराव केला. त्यानं व्यंकटेश अय्यर आणि रजत पाटीदार यांच्यासोबत स्वत:च्या गोलंदाजीत सुधारणा करण्यासाठी खूप मेहनत घेतली. याच स्लोअर गोलंदाजीच्या जोरावर आवेश खान याला आयपीएलमध्ये यश मिळालं.

आयपीएलच्या यंदाच्या पर्वात आवेश खान याला रिषभ पंत याच्यासोबत खेळण्याची संधी मिळाली. आवेश आणि रिषभ याआधी २०१६ साली अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेत एकत्र खेळले आहेत.

रिषभ त्याला आयपीएलमध्ये सांकेतिक इशारे करुन विविध पद्धतीनं गोलंदाजी करण्याच्या सूचना देत होता. त्यासाठी रिषभनं आधीच रणनिती आखली होती. गोलंदाजीसाठी धाव घेण्याआधीच रिषभ यष्टीमागून आवेशला इशारा करत असे, असं खुद्द आवेख खान यानं सांगितलं.

आवेश खाननं आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनी याची विकेट घेतली आहे. याबाबतची आवेश खान यानं महत्वाची माहिती दिली. आवेश खानला लाँग ऑनवर फिल्डर हवा होता पण रिषभ पंतनं मिड ऑनवर ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

रिषभनं शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू टाकण्याचा सल्ला दिला. आवेशनंही तसंच केलं धोनीनं चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला पण बॅटची कडा घेऊन चेंडू थेट स्टम्पवर आदळला आणि धोनी बाद झाला, याचा खुलासा स्वत: आवेश खान यानं केला आहे.