'या' सुंदर महिला क्रिकेटपटूंनी गाजवलं मैदान; केला भल्याभल्यांना न जमलेला पराक्रम

ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलिसा हिली आणि एलिसे पेरी यांनी विश्वविक्रमाची नोंद केली. महिलांच्या बिग बॅश लीग ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये हिली आणि पेरी या जोडीनं भल्याभल्यांना न जमलेला पराक्रम करून दाखवला. सिडनी सिक्सर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना हिली व पेली यांनी मेलबर्न स्टार्स संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी संपूर्ण 20 षटकं खेळून काढली.

हिलीनं 53 चेंडूंत 13 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 106, तर पेरीनं 65 चेंडूंत 12 चौकारांसह नाबाद 87 धावा केल्या. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर सिडनी सिक्सर्स संघाने 199 धावांचा डोंगर उभा केला. मेलबर्न स्टार्सला 6 बाद 154 धावा करता आल्या.

ट्वेंटी-20 सामन्यात संपूर्ण 20 षटकं खेळून काढणारी हिली व पेरी ही तिसरी जोडी आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या लिझेल ली व डेन व्हॅन निएकर्क यांनी पाकिस्तानविरुद्ध ( 2014) 163 धावा केल्या होत्या. 2016मध्ये चेशायरच्या एलि कॅथरीन मॅसोन व लौरा मॅकलीओड यांनी 150 धावा केल्या होत्या. पण, या सर्वांना मागे टाकत हिली व पेरीनं हा विक्रम मोडला.

बिग बॅश ( पुरुष व महिला) च्या इतिहासात तीन शतक झळकावणारी हिली पहिलीच खेळाडू ठरली. आजच्या खेळीपूर्वी तिनं अॅडलेड स्ट्रायकर्स ( 2017-18) व ( 2018-18) संघाविरुद्ध अनुक्रमे 106 व 112* धावा केल्या होत्या.

महिला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्या चार शतकं नावावर असलेली हिली चौथी फलंदाज आहे.

हिली व पेरी यांची 199* धावांची भागीदारी ही बिग बॅश लीगमधील सर्वोत्तम भागीदारी ठरली. त्यांनी 2015-16च्या लीगमध्ये मेग लॅनिंग व मिग्नन डू प्रिझ यांचा दुसऱ्या विकेटसाठीचा 156 धावांचा विक्रम मोडला.

बिग बॅश लीगमध्ये पुरुष व महिला क्रिकेट सामन्यांतील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. या जोडीनं पुरुष बिग बॅश मध्ये ल्युक राईट व रॉब क्विनी ( मेलबर्न स्टार्स विरुद्ध होबार्ट हरीकेन्स, 2012) यांचा 172 धावांचा विक्रम मोडला.