India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणेनं मोडले अनेक विक्रम, १९८६नंतर बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाचा पराक्रम

India vs Australia, 2nd Test : अॅडलेड कसोटीतील मानहानिकारक पराभवानंतर टीम इंडिया असा दमदार कमबॅक करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. त्यात कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला, दुखापतीमुळे मोहम्मद शमीनंही माघार घेतली होती. या खडतर परिस्थितीत अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) नेतृत्व कौशल्य दाखवले अन् ऑस्ट्रेलियाला सडेतोड उत्तर दिले.

टीम इंडियानं बॉक्सिंग डे कसोटीत ८ विकेट राखून बाजी मारली आणि चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. या विजयासह अजिंक्यनं स्वतःच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद केली.

भारताच्या १३१ धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची दैना उडाली. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात २०० धावा करता आल्यानं टीम इंडियासमोर विजयासाठी ७० धावांचे माफक लक्ष्य होते.

मयांक अग्रवाल ( ५) व चेतेश्वर पुजारा ( ३) झटपट माघारी परतल्यानंतर शुबमन गिल व अजिंक्य रहाणेनं संगाला विजय मिळवून दिला. अजिंक्यनं विजयी धाव घेतली. गिल ३५ धावांवर, तर अजिंक्य २७ धावांवर नाबाद राहिला. या विजयानंतर भारतीय संघाचे सर्वांनी कौतुक केलं.

महान फलंदाज सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांनी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. तेंडुलकर म्हणाला,''विराट कोहली, रोहित शर्मा, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांच्याशिवाय विजय मिळवला, म्हणजे हे खूप मोठं यश आहे. ०-१ अशा पिछाडीनंतर टीम इंडियानं दाखवलेल्या लढाऊ वृत्तीचे कौतुक.''

विराटनं ट्विट केलं की,''संघातील प्रत्येक खेळाडूनं विजयासाठी स्वतःला झोकून दिले. टीमसाठी आणि विशेषतः अजिंक्यसाठी खूप आनंद होत आहे. त्यानं संघाचे नेतृत्व खंबीरपणे सांभाळले.''

अजिंक्य रहाणेनं आतापर्यंत १२ कसोटी शतक झळकावली आणि त्याची एकही शतकी खेळी व्यर्थ ठरली नाही. त्यानं झळकावलेल्या १२ शतकांपैकी ९ सामने भारताने जिंकले, तर तीन अनिर्णीत राखले.

ऑस्ट्रेलियात कसोटी सामन्यात विजयी धाव घेणारा अजिंक्य हा पाचवा परदेशी कर्णधार ठरला. यापूर्वी आर्थर श्रेव्स्बरी ( १८८४), अॅर्ची मॅकलॅऱेन ( १८९७), माईक ब्रेरली ( १९७९) व क्लाईव्ह लॉईड ( १९८२) यांनी अशी कामगिरी केली.

महेंद्रसिंग धोनीनंतर कसोटीत विजयी धाव घेणारा अजिंक्य रहाणे हा पहिलाच कर्णधार. धोनीनं २०१३मध्ये दिल्ली कसोटीत विजयी धाव घेतली होती.

कसोटीत कर्णधार म्हणून पहिले तीनही सामने जिंकणारा अजिंक्य हा दुसरा भारतीय कर्णधार आहे. महेंद्रसिंग धोनीनं सलग चार कसोटी सामने जिंकले आहेत.

ऑस्ट्रेलियात भारतीय कर्णधारानं झळकावलेलं शतक विजयात महत्त्वाचे ठरल्याची ही पहिलीच वेळ. अजिंक्य रहाणेनं तो मान पटकावला.

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर बॉक्सिंग डे कसोटीत सलग दोन विजय मिळवणारा भारता हा दुसरा संघ. यापूर्वी इंग्लंडनं १९८२ व १९८६ मध्ये असा पराक्रम केला होता.