Virat Kohli: कोहलीकडून कॅप्टन्सी काढून घेणार? BCCI चे सचिव जय शाह यांनी केलं मोठं विधान

Virat Kohli Captaincy: टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबतच्या भविष्यावरुन वाद-विवाद सुरू झाले आहेत. कोहली कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर आता थेट बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

टी-२० वर्ल्डकपनंतर विराट कोहली मर्यादित षटकांच्या प्रकारात भारतीय संघाचं नेतृत्त्व करणार नाही. कोहली स्वत:हून कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी IANS शी बोलताना कोहलीच्या कॅप्टन्सी सोडण्याबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चा वायफळ असल्याचं म्हटलं होतं.

अरुण धुमाळ यांच्या स्पष्टीकरणानंतरही कोहलीच्या कॅप्टन्सीबाबत अजूनही साशंकता राहिली असेल तर आता थेट बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीच याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी कोहलीच्या कॅप्टन्सीबाबतच्या भविष्याबाबत स्पष्ट शब्दांत आपलं मत व्यक्त केलं आहे.

कोहलीच्या करिअरबाबत बोलताना जय शाह म्हणाले, "जोवर संघ चांगली कामगिरी करत आहे तोवर कर्णधारपदाच्या बदलाचा प्रश्नच निर्माण होत नाही. संघ चांगली कामगिरी करत असल्याचं आपण पाहत आहोत. त्यामुळे अशा चर्चांना काही अर्थ नाही"

जय शाह यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे महत्त्वाचं विधान केलं आहे. कोहलीकडून कॅप्टन्सी काढून घेऊन उपकर्णधार रोहित शर्मा याच्याकडे कर्णधारपद दिलं जाणार असल्याची चर्चा होती.

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेनंतर कोहली भारताच्या वन-डे आणि टी-२० संघाचं कर्णधारपद सोडून कमान रोहित शर्माकडे देईल. कोहली फक्त भारतीय कसोटी संघाचं नेतृत्त्व करेल अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली होती.

जय शाह यांनी यावेळी कोहलीचं तोंडभरुन कौतुक केलं आणि कोहलीच्या नेतृत्त्वात संघानं प्राप्त केलेल्या यशाचा पाढाच वाचला. कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे हे आपल्याला विसरुन चालणार नाही असं जय शाह म्हणाले.

इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये २-१ नं पुढे होतो. याआधी इंग्लंडविरुद्ध ३-२ अशी मात दिली होती. तर ऑस्ट्रेलियातही २-१ अशी मालिका जिंकली होती. श्रीलंकेवर २-० अशी मात दिली. तर न्यूझीलंडला -४-० असा व्हाइटवॉश कोहलीच्याच नेतृत्वात दिल्याचं जय शाह यांनी म्हटलं.

कोहलीसमोर आयसीसीची स्पर्धा जिंकणं एक मोठं आव्हान आहे. भारतानं गेल्याच आठवड्यात टी-२० वर्ल्डकपसाठी संभाव्य संघाची घोषणा केली आहे. यात महेंद्रसिंग धोनी याची संघाचा मेन्टॉर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

धोनीकडे दिलेल्या जबाबदारीवर भारतीय क्रिकेट चाहते खूष असून बीसीसीआयच्या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. धोनीच्या अनुभवाचा संघाला खूप फायदा होईल असं सांगितलं जात आहे.