ICCच्या 'त्या' निर्णयामुळे महेंद्रसिंग धोनीसह 7 दिग्गज खेळू शकणार नाहीत वर्ल्ड कप!

कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) यंदा होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हा निर्णय जाहीर करताना आयसीसीनं पुढील तीन वर्ल्ड कप स्पर्धा ( दोन ट्वेंटी-20 आणि एक वन डे ) यांचा कालावधीही निश्चित केला. त्यानुसार पुढील ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2021मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत खेळला जाईल.

आयसीसीच्या या निर्णयामुळे आता महेंद्रसिंग धोनीसह अनेक दिग्गज खेळाडूंचे आणखी एक वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न भंगणार आहे.

गतवर्षी झालेल्या वन डे वर्ल्ड कपनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे आणि आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे पुनरागमन आयपीएलमधील कामगिरीवर अवलंबून आहे.

पुढील वर्षी धोनी 40 वर्षांचा होईल आणि त्याला वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी देण्याचं धाडस बीसीसीआय नक्कीच दाखवणार नाही. तो तंदुरुस्त असला तरी बीसीसीआय भविष्याचा विचार करूनच संघ निवडेल हे नक्की.

ऋषभ पंत, संजू सॅमसन, लोकेश राहुल ही नावं चर्चेत आहेतच. त्यामुळे 2021चा वर्ल्ड कप खेळण्याचे धोनीचे चान्स कमीच आहेत. अशाच 2019चा वर्ल्ड कप हा धोनीचा अखेरचा वर्ल्ड कप ठरेल.

धोनीसह वेस्ट इंडिजचा स्टार ऑलराऊंडर ड्वेंन ब्राव्हो यानंही यंदा होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी निवृत्तीचा निर्णय मागे घेताल होता. पुढील वर्षी ब्राव्हो 38 वर्षांचा होईल आणि 2021 वर्ल्ड कप खेळण्याची त्याची शक्यता कमी आहे.

वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल हाही यंदाचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी उत्सुक होता. 2019नंतर तो एकही ट्वेंटी-20 सामना खेळलेला नाही. पुढील वर्षी तो 42 वर्षांचा होईल आणि त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

यंदाच्या वर्ल्ड कपसाठी सर्वाधिक चर्चा होती ती एबी डिव्हिलियर्सची. एबी निवृत्तीचा निर्णय मागे घेत वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी उत्सुक होता. पण, आता त्याच्या उत्सुकतेवरही पाणी फिरले आहे. एबीसह डेल स्टेन, इम्रान ताहीर यांनाही यंदाचा वर्ल्ड कप रद्द झाल्याचा फटका बसला आहे.

लसिथ मलिंगा यालाही फटका बसला आहे. पुढील वर्षी तोही 38 वर्षांचा होईल.

पाकिस्तानचा मोहम्मद हाफीज आणि शोएब मलिक यांचेही स्वप्न भंगले आहे.