फोन नंबरसाठी आईची मदत अन् ताजमहालसमोर प्रपोज; 'अशी' आहे डिव्हिलीयर्सची लव्ह स्टोरी

मैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना बिनधास्तपणे सामोरं जाणारा एबी डी'व्हिलियर्स प्रत्यक्षात मात्र अतिशय लाजाळू आहे. त्यामुळेच डॅनियल नावाच्या एका तरुणीला एका कार्यक्रमात भेटल्यावर डी'व्हिलियर्सच्या तोंडून एक शब्दही फुटला नव्हता. डॅनियलची भेट म्हणजे डी'व्हिलियर्ससाठी लव्ह अॅट फर्स्ट साईट होती. मात्र मैदानात प्रतिस्पर्ध्यांची गोलंदाजी फोडून काढणारा हा पठ्ठ्या डॅनियलसमोर अक्षरश: क्लिन बोल्ड झाला.

एका कार्यक्रमात डॅनियलला पाहताच डी'व्हिलियर्सची दांडी उडाली. मात्र तिच्यासमोर बोलायची हिंमत होईना. त्यामुळे त्यानं थेट आईची मदत घेतली. त्या मुलीचा नंबर घे, अशी विनंती डी'व्हिलियर्सनं मातोश्रींना केली. माँ साहेबांनी लाडक्या लेकाची ही विनंती मान्य केली आणि डॅनियलचा नंबर घेतला. डी'व्हिलियर्स त्यावेळी 23 वर्षांचा होता आणि त्यानं नुकतंच दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान मिळवलं होतं.

डॅनियलच्या लांबसडक केसांनी आणि सुंदर डोळ्यांनी डी'व्हिलियर्स घायाळ झाला. अतिशय लाजाळू असलेला डी'व्हिलियर्स पहिल्या भेटीत डॅनियलला फक्त हॅलो म्हणाला होता. मात्र या दोघांच्या नशिबात एकत्र येणं लिहिलेलं होतं. त्यानंतर हे दोघे अनेक कार्यक्रमांमध्ये भेटले. डी'व्हिलियर्सच्या भावाच्या लग्नात डॅनियलनं एक सुंदर गाणं गायलं. यानंतर लग्न करेन तर हिच्यासोबतच, असं डी'व्हिलियर्सनं मनोमन ठरवून टाकलं.

डी'व्हिलियर्सच्या प्रेमाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेत झाली असली, तरी ही प्रेम कहाणी सुफळ संपूर्ण झाली ती भारतात. हे दोघे भारतात फिरायला आले असताना, डी'व्हिलियर्सनं ताजमहालसमोर डॅनियलला एका गुडघ्यावर बसून अगदी फिल्मी स्टाईल प्रपोज केलं. माझ्याशी लग्न करशील का? असं डी'व्हिलियर्सनं ताजमहालच्या साक्षीनं डॅनियलला विचारलं. डॅनियल थोडा वेळ शांत उभी होती. मात्र काही सेकंदात तिनं होकार दिला.

ताजमहाल प्रेमाचं प्रतीक असल्यानं याच ठिकाणी डॅनियलला प्रपोज करायचं, हे डी'व्हिलियर्सनं आधीच ठरवलं होतं. आयपीएलच्या निमित्तानं डी'व्हिलियर्स अनेकदा भारतात आला होता. त्यामुळे ताजमहालच्या समोर डॅनियलला मागणी घालायची, असा विचार त्याच्या मनात बराच काळापासून होता.

डॅनियलसोबतचे क्षण आजन्म सोबत असावेत, म्हणून डी'व्हिलियर्स थोडं खोटंही बोलला. डॅनियलसोबत एन्जॉय केलेले क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी त्यानं काही फोटोग्राफर स्वत:सोबत नेले होते. हे आपले अंगरक्षक असल्याचं डी'व्हिलियर्सनं डॅनियलला सांगितलं होतं. या फोटोग्राफर्सनी टिपलेले फोटो पाहून डॅनियलला आश्चर्याचा धक्का बसला.

डॅनियल आणि डी'व्हिलियर्सला सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. दोघे इन्स्टाग्रामवर एकमेकांसोबतचे फोटोदेखील शेअर करतात.

डॅनियल आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याला डी'व्हिलियर्सनं कायमच प्राधान्य दिलं आहे. डी'व्हिलियर्स कायम त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून कुटुंबासाठी आवर्जून वेळ काढतो.