वर्ल्ड कपमधील कामगिरीनंतर 'या' पाच खेळाडूंसाठी IPL मध्ये चढाओढ

लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडने वर्ल्ड कप जेतेपदाचा दुष्काळ संपवताना अखेर विजयी चषक उंचावला. पण, न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्याचा निकाल हा चौकारांवर लावण्यात आल्यानं सर्वांना आश्चर्य वाटले. निर्धारित 50 षटकांत सामना 241-241 असा, तर सुपर ओव्हरमध्ये 15-15 असा बरोबरीत सुटला होता. केवळ चौकार अधिक म्हणून इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. पण, या स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. यात इंडियन प्रीमिअर लीगच्या फ्रँचायझींचाही समावेश आहे. आगामी आयपीएल स्पर्धेत कोणत्या पाच खेळाडूंवर नजर असेल ते पाहूया...

मोहम्मद सैफूद्दीन - बांगलादेशच्या या डावखुऱ्या जलदगती गोलंदाजानं वर्ल्ड कप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यानं 7 सामन्यांत 13 विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय भारताविरुद्घच्या सामन्यात त्यानं अर्धशतकी खेळी करून फलंदाजीतही योगदान दिले होते. बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये त्याच्या नावावर 13 सामन्यांत 20 विकेट्स आहेत. कोणात रस्सीखेच - कोलकाता नाइट रायडर्स, किंग्स इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

मार्क वूड - इंग्लंडच्या या खेळाडूनं वेगवान माऱ्यानं प्रतिस्पर्धींना हैराण केले. त्यानं सातत्यानं 150kph च्या गतीनं चेंडू टाकले आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं 18 विकेट्स घेतल्या आहेत. 2018च्या आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य होता, परंतु त्याला एकही सामना खेळवला नाही. कोणात रस्सीखेच - चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स

जिमी निशॅम - न्यूझीलंड संघाचा नायक.. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर उपयुक्त असा खेळाडू. वर्ल्ड कपमध्ये त्यानं 15 विकेट्स घेतल्या आहेत आणि 232 धावाही केल्या आहेत. कोणात रस्सीखेच - राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, किंग्स इलेव्हन पंजाब

अ‍ॅलेक्स केरी - ऑस्ट्रेलियाच्या या युवा यष्टिरक्षकानं सर्व टीकाकारांची तोंड बंद केली. त्यानं सातत्यपूर्ण कामगिरी करताना वर्ल्ड कपमध्ये 62.5 च्या सरासरीनं 375 धावा चोपल्या. कोणात रस्सीखेच - सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

रॅसी व्हॅन डेर ड्युसेन - दक्षिण आफ्रिकेचा हा खेळाडू मधल्या फळीत उपयुक्त ठरू शकतो. त्यानं 62.2 च्या सरासरीनं 311 धावा केल्या आहेत. कोणात रस्सीखेच - दिल्ली कॅपिटल्स, किंग्स इलेव्हन पंजाब, चेन्नई सुपर किंग्स