विराट कोहलीपेक्षाही अधिक मानधन घेणारे 'हे' आहेत ५ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू; कोटीच्या कोटी उड्डाणं!

क्रिकेट विश्वात सध्या विराट कोहलीचं नाव जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. यासोबतच त्याला मिळणाऱ्या मानधनाचीही चर्चा केली जात आहे. काय आहे यामागचं कारण? जाणून घेऊयात...

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं दोन मोठ्या घोषणा करुन सर्वांनाच धक्का दिला. टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय टी-२० संघाच्या आणि आयपीएलनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या कर्णधारपदावरुन पायऊतार होणार असल्याचा निर्णय जाहीर केला.

कोहलीच्या निर्णयावर विविध चर्चा आणि टीका-टिप्पणी सरू असताना त्याला मिळत असलेल्या मानधनाबाबतही सोशल मीडियात चर्चा सुरू झाली. कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेमकं किती मानधन मिळतं आणि इतर आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनाशी तुलना केली जाऊ लागली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीपेक्षाही अधिक मानधन घेणारे खेळाडू कोण आहेत हे आपण जाणून घेऊयात.

विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी मिळणाऱ्या मानधनापेक्षा अधिक मानधन घेणारे एकूण ५ क्रिकेटपटू सध्याच्या घडीला आहेत. विराट कोहलीला बीसीसीआयकडून ७ कोटी रुपये इतकं वार्षिक मानधन मिळतं.

इंग्लंडचा यष्टीरक्षक जोस बटलर संघासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात म्हणजेच वनडे, कसोटी आणि टी-२० संघाचा भाग आहे. गेल्या दोन वर्षात त्यानं देशाच्या कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. सध्या जोस बटलर याला इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून १९ कोटी इतकं वार्षिक मानधन दिलं जातं.

ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ देखील क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात देशाच्या क्रिकेट संघाचं प्रतिनिधीत्व करतो. यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून स्मिथला ४ मिलियन यूएस डॉलर इतकं मानधन दिलं जातं.

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स सध्या क्रिकेटपासून दूर असला तरी तोही इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी करारबद्ध खेळाडू आहे. त्याला वार्षिक ८.८५ कोटी इतकं मानधन दिलं जातं.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर देखील इंग्लंडच्या तिनही संघाचं प्रतिनिधीत्व करतो. आर्चरला ९.३९ कोटी इतकं मानधन दिलं जातं.

इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि कोहलीला दिल्या जाणाऱ्या मानधनात फारसा फरक नाही. जो रुट याला वार्षिक ७.२२ कोटी इतकं मानधन दिलं जातं. सध्या जो रुट इंग्लंडच्या कसोटी संघाचं नेतृत्त्व करतो आणि कसोटी विश्वात सर्वाधिक मानधन देणारा कर्णधार म्हणून तो अव्वल स्थानावर आहे.

Read in English