रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली 13 वर्ष; पहिली सहा वर्ष ठरला फ्लॉप, पण आज थरथर कापतात गोलंदाज!

भारतीय संघाचा हिटमॅन, सिक्सर किंग रोहित शर्मा याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला आज 13 वर्ष पूर्ण झाली. रोहितनं 13 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेट संघातून पदार्पण केले होते.

आयर्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात रोहितला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. स्थानिक क्रिकेटमधील सर्वात प्रतिभावान फलंदाज म्हणून रोहितला टीम इंडियात स्थान मिळाले होते, परंतु त्याला आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची पहिली सहा वर्ष अपयशाला सामोरे जावे लागले.

आता जगातील दिग्गज गोलंदाज त्याच्यासमोर गोलंदाजी करताना थरथर कापतात...

2007मध्ये रोहितच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली, परंतु 2013पर्यंत त्याची कामगिरी फार समाधानकारक झाली नाही. त्याला 81 वन डे डावांतमध्ये 30.43च्या सरासरीनं 1978 धावा करता आल्या.

त्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं एक क्रांतिकारी निर्णय घेतला आणि रोहितच्या आयुष्याला जणू कलाटणी मिळाली. धोनीनं रोहितला सलामीला खेळण्याची संधी दिली.

2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत धोनीनं हिटमॅनकडे सलामीवीराची जबाबदारी सोपवली. त्यानंतर रोहितनं मागे वळून पाहिले नाही. 2013 ते आतापर्यंत रोहितनं 134 वन डे डावांत 59.74च्या सरासरीनं 7050 धावा चोपल्या. त्यात 27 शतकं आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे. सलामीवीर म्हणून रोहितच्या धावांची सरासरी दुप्पट झाली.

सलामीवीर म्हणून रोहितनं अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली. त्याच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये 3 द्विशतकं आहेत. वन डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. त्यानं 2014मध्ये कोलकाता वन डे सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 264 धावांची खेळी केली होती.

रोहितनं वन डे क्रिकेटमध्ये 8 वेळा 150 पेक्षा अधिका धावा करण्याचा पराक्रम केला आहे. एकाच वन डे सामन्यात सर्वाधिक 16 षटकारांचा भारतीय फलंदाजाचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. 264 धावांच्या खेळीत रोहितनं 33 चौकार लगावले होते आणि तोही एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. रोहितच्या नावावर सध्या 29 शतकं आहेत.

रोहित ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 4 शतक ठोकणारा एकमेव फलंदाज आहे. त्यानं ट्वेंटी-20त 35 चेंडूंत शतक झळकावले होते. या कामगिरीसह त्यानं डेव्हिड मिलरच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली होतो.

रोहितनं 2019च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत 5 शतकं झळकावली. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाजआहे. रोहितनं वन डे क्रिकेटमध्ये 244 षटकार खेचले आहेत.

रोहितनं कारकीर्दितल्या पहिल्या दोन कसोटीत शतकी खेळी साकारली आणि अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय आहे. एका कसोटी सामन्यात सर्वाधिक 13 षटकारांचा विश्वविक्रमही रोहितच्या नावावर आहे. शिवाय त्यानं एका कसोटी मालिकेत 19 षटकार मारण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही नावावर केला आहे.

कसोटीत त्यानं 32 सामन्यांत 46.54 च्या सरासरीनं 2141 धावा ( 6 शतकं व 10 अर्धशतकं) केल्या आहेत. ट्वेंटी-20त त्यानं 108 सामन्यांत 2773 धावा केल्या आहेत, तर 224 वन डे सामन्यांत 9115 धावा नावावर आहेत.