Tour of Duty: सैन्य भरतीचे सर्व नियम बदलणार, ४ वर्ष सेवेनंतर निवृत्ती; लवकरच घोषणा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 03:33 PM2022-05-28T15:33:59+5:302022-05-28T15:37:41+5:30

देशात सैन्य स्तरावर भरती प्रक्रियेत एक मोठा बदल होण्याची तयारी सुरू आहे. सैन्य भरतीसाठी एक नियम लागू करण्यात येईल. भारतीय लष्कर, वायूदल आणि नौदलात आता सैनिकांची भरती टूर ऑफ ड्यूटी अंतर्गत करण्यात येणार आहे.

या योजनेतंर्गत भारतीय सैन्य भरतीच्या तिन्ही सुरक्षा दलांमध्ये दाखल होण्यासाठी नवीन प्रणालीत दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टूर ऑफ ड्यूटीच्या अंतिम आराखड्यावर चर्चा सुरू आहे. त्यात काही नवीन सूचना प्रस्तावित आहेत. लवकरच याची घोषणा करण्यात येऊ शकते.

सैन्य भरती प्रक्रियेत मोठे बदल करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार सैन्यात ४ वर्षांची भरती केली जाईल. त्यानंतर सर्वांना निवृत्त करण्यात येईल. परंतु यातील २५ टक्के कर्मचाऱ्यांना पुन्हा पूर्ण सेवेसाठी शॉर्टलिस्ट करण्यात येईल.

टूर ऑफ ड्यूटी योजनेच्या अंतिम मसुद्यावर चर्चा झाली असून लवकरच याबाबत घोषणा केली जाऊ शकते. भारतीय सैन्यात लष्कर, वायूदल, आणि नौदल अशा तिन्ही दलांसाठी ही भरती प्रक्रिया असेल. नवीन भरती प्रक्रियेची घोषणा आता कुठल्याही दिवशी होऊ शकते.

सैन्य भरतीत प्रस्तावित नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. सुरुवातीला टूर ऑफ ड्युटीमध्ये देशातील नागरिकांना ३ वर्षासाठी सैन्यात भरती होण्यास सांगितले जात होते. परंतु आता ४ वर्ष सेवा केल्यानंतर सेवामुक्त केले जाईल. त्यानंतर ३० दिवसांच्या कालावधीत त्यातील २५ टक्के पुन्हा बोलावले जातील.

टूर ऑफ ड्युटी अंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्यांना पेन्शन आणि निश्चित वेतनसाठी पूर्ण सेवा ग्राह्य धरणार नाही. त्यामुळे मोठी रक्कम वाचण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तिन्ही दलात काही पद याला अपवाद असतील.

सैन्यात जवानांचे सरासरी वय ३५-३६ वर्ष असते. परंतु टूर ऑफ ड्यूटी लागू झाल्यानंतर ४-५ वर्षात सैनिकांचे सरासरी वय २५-२६ इतके असेल. तसेच ज्यूनिअर कमिशन अधिकारी, अन्य रँक अधिकाऱ्यांच्या पेन्शनसाठी खर्च होणारी रक्कम जास्त आहे. अशात टूर ऑफ ड्युटी लागू झाल्यास त्यात सुधारणा होऊ शकते.

कोरोना महामारीमुळे गेल्या २ वर्षात लष्करात भरती होऊ शकली नाही. तिन्ही सुरक्षा दलांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. लष्करात १२.१२ लाख जवान आहेत परंतु ८१ हजार पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे वायूदलात ७ हजार आणि नौदलात साडे बारा हजार पदे रिक्त आहेत.

या योजनेमुळे दरवर्षी कोट्यवधी रुपये बचत करण्यात यश येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही सैन्य दल दरवर्षी सव्वा लाख कोटी रुपये पेन्शनवर खर्च करते. २०२२-२३ या काळात १.१९ लाख कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे टूर ऑफ ड्युटीअंतर्गत युवकांना कामावर ठेवल्यास पेन्शन खर्च वाचण्याची शक्यता आहे.

काय आहे टूर ऑफ ड्यूटी योजना? - एका ठराविक कालावधीसाठी सैन्यात भरती होण्याला टूर ऑफ ड्यूटी म्हटलं जाते. टूर ऑफ ड्युटी कन्सेप्ट नवीन नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटीश वायूदलाने टूर ऑफ ड्युटी योजना आणली होती.