TATA ग्रुपची ‘ही’ कंपनी देतेय ६० हजारांची स्कॉलरशीप; पाहा, कोण करु शकतं अर्ज आणि प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 05:54 PM2021-11-03T17:54:12+5:302021-11-03T17:59:14+5:30

आता TATA ग्रुपमधील एका कंपनीने विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेतला असून, शिक्षणासाठी ६० हजारापर्यंतची शिष्यवृत्ती देत आहे.

TATA ग्रुप आताच्या घडीला विविध क्षेत्रात दमदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हे, तर Air India ची मालकी परत मिळवण्यातही TATA ग्रुपला यश मिळाले आहे. TATA ग्रुपचे प्रमुख असलेल्या रतन टाटा (Ratan Tata) यांनी याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

यातच आता TATA ग्रुपमधील एका कंपनीने विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेतला असून, शिक्षणासाठी ६० हजारापर्यंतची शिष्यवृत्ती देत आहे. ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही आणि पुढील शिक्षणासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी ज्या विद्यार्थीनींना अडचणी येत आहेत, त्यांच्यासाठी ही स्कॉलरशीप उपलब्ध करून देण्यात आली आहे.

इंजिनियरिंग तसेच व्यवस्थापनाची पदवी घेणाऱ्या विद्यार्थीनींनाही ही स्कॉलरशीप उपलब्ध आहे. तसेच उमेदवारांना रोजगारक्षम बनवण्यासाठी प्रशिक्षणही या कंपनीकडून देण्यात येते. TATA ग्रुपच्या या कंपनीचे नाव Tata Housing असून, या योजनेचे नाव Tata Housing Scholarship Scheme असे आहे.

या शिवाय बीटेक, बीई, बी.आर्क डिग्री घेणाऱ्या विद्यार्थीनींना या योजनेअंतर्गत स्कॉलरशीपसाठी अर्ज करता येऊ शकेल. तसेच एमबीए करणारे विद्यार्थीनीही यासाठी पात्र असतील, असे सांगितले जात आहे.

Tata Housing ची स्कॉलरशीप ही देशात शिक्षण घेणारे कोणतेही विद्यार्थीनी घेऊ शकतात. मात्र, यासाठी दिलेल्या परीक्षेत ५० टक्के गुण मिळण्याची अट ठेवण्यात आली आहे. उमेदवार बी.टेक, बीई किंवा बी.आर्कच्या ४ वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असायला हवा.

तसेच अर्ज केलेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा अधिक असता कामा नये, असे सांगितले जात आहे. या स्कॉलरशीपसाठी tatarealty.in/sustainability/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येऊ शकेल.

या संकेतस्थळावर गेल्यावर प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. यानंतर ईमेल आणि पासवर्ड सादर करून लॉगिन आयडी तयार करावा. तसेच अर्जात आवश्यक सर्व गोष्टींची पूर्तता करावी आणि आवश्यक कागदपत्रेही सादर करावीत.

यानंतर अर्ज सबमिट करावा. यासाठी इंजिनियरिंगच्या प्रथम वर्षाची मार्कशीट, महाविद्यालयाचे ओळख पत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, १० वी आणि १२ वीची मार्कशीट तसेच अन्य आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.

याशिवाय द्वितीय वर्षात प्रवेश घेतल्याची कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच एससी, एसटीसाठी जातीचा दाखला किंवा संबंधित प्रमाणपत्र जोडावे, असे सांगितले जात आहे.