नोकरीची सुवर्णसंधी! दिग्गज आयटी कंपनी लवकरच १ लाख लोकांना नोकरी देणार, जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 04:47 PM2021-07-29T16:47:10+5:302021-07-29T16:51:33+5:30

अमेरिकन दिग्गज आयटी कंपनी भारतात लवकरच १ लाख लोकांना नोकरी देणार आहे. जाणून घ्या याबाबत सारंकाही...

कोरोना प्रादुर्भावामुळे जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. लॉकडाऊनच्या कठोर निर्णयामुळे अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या. यातच अमेरिकी दिग्गज आयटी कंपनी कॉग्निझंट भारतीयांसाठी एक आशेचा किरण ठरणार आहे. कारण या कंपनीकडून यंदा भारतात १ लाख लोकांना नोकऱ्या देणार आहे.

जूनच्या तिमाहीत कॉग्निझंट कंपनीचे एकूण उत्पन्न ४१.८ टक्क्यांनी वाढून ५१.२ कोटी अमेरिकन डॉलरवर म्हणजेच जवळपास ३८०१ कोटी रुपये इतके झाले आहे.

यंदा १ लाख नव्या नोकऱ्या देण्याचा मानस असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. जून २०२० च्या तिमाहीत देखील कंपनीचे उत्पन्न ३६.१ कोटी डॉलर इतकं होतं. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये कंपनीनं कमाईच्या एकूण वाढीचं लक्ष्य १०.२ ते ११.२ टक्क्यांनी वाढवलं होतं.

आम्ही जवळपास १ लाख भरती आणि १ लाख सहकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी करत आहोत. याशिवाय २०२१ मध्ये सुमारे ३० हजार नवी पदवीधर आणि २०२२ साठी भारतातील नवीन पदवीधरांना ४५ हजार नव्या ऑफर्स देण्याचा आमचा मानस आहे, असं कंपनीचे सीईओ ब्रायन हम्फ्रीज यांनी सांगितलं.

कॉग्निझंट कंपनीनं सध्या २ लाख लोकांना रोजगार दिला आहे. कंपनीनं दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे. कंपनीच्या क्षमतेत आता वाढ करण्याची गरज आहे. या माध्यमातून बाजारात लक्ष्यवेधी गुंतवणुकीच्या ध्येयापर्यंत पाऊल टाकण्यास सुरूवात करणार आहे. यातून जास्तीत जास्त ग्राहकांना मदत आणि मॉर्डन बिझनेसची निर्मिती होण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे, असंही हम्फ्रीज म्हणाले.

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला सध्या ज्युनिअर आणि मिड लेव्हर कर्मचाऱ्यांनी आवश्यकता आहे. फक्त भारतातच नव्हे, तर इतर देशांमध्येही कंपनी भरती करणार आहे.

कॉग्निझंट कंपनीकडून गेल्या काही महिन्यांत पॉलिसी बदलाची घोषणा करण्यात आली होती. कंपनीकडून त्रैमासिक प्रमोशन सायकलसोबतच जॉब रोटेशन आणि रि-स्किलिंग इनिशिएटिव्हवर विचार केला जात आहे.

त्यामुळे आयटी क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी लवकरच कॉग्निझंट या दिग्गज आयटी कंपनीत नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची माहिती येत्या काही दिवसांत जाहीर केली जाऊ शकते.

Read in English