Zomato Share Listing: झोमॅटोचं शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 11:59 AM2021-07-23T11:59:52+5:302021-07-23T12:08:45+5:30

Zomato shares Listing : झोमॅटोच्या शेअर्सचं झालं जबरदस्त लिस्टिंग. गुंतवणुकदारांचे पैसे पहिल्याच दिवशी दुप्पट.

Zomato Share Listing: ऑनलाईन फूड ऑर्डरिंग प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या शेअर्सची आज शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग झाल्याचं पाहायला मिळालं. झोमॅटोच्या शेअर्सचे दर त्याच्या आयपीओच्या प्राईजच्या तुलनेत जवळपास ८० टक्के प्रिमिअमवर लिस्ट झाले.

झोमॅटोच्या शेअर्ससाठी प्राईज बँड ७६ रूपये निश्चित करण्यात आला होता. झोमॅटोचे शेअर्स निर्धारित वेळेच्या पूर्वीच शेअर बाजारावर लिस्ट करण्यात आले.

दरम्यान, यापूर्वी कंपनीनं २३ जुलै ते २७ जुलैच्या दरम्यान शेअर्स लिस्ट होऊ शकतात असं म्हटलं होतं. परंतु हे शेअर्स शुक्रवारी २३ जुलै रोजीच लिस्ट करण्यात आले.

९३७५ कोटी रूपयांचा हा मेगा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी गेल्या आठवड्यात १४ ते १६ जुलैदरम्यान उघडला होता. झोमॅटोचं मार्केट कॅप लिस्टिंग नंतरच १ लाख कोटी रूपयांच्या पुढे गेला आहे.

झोमॅटोचा आयपीओ मार्च २०२० नंत देशातील सर्वात मोठा आयपीओ इश्यू होता. कंपनीनं यासाठी ७२ ते ७६ रूपयांचा प्राईज बँड निश्चित केला होता.

झोमॅटोनं या आयपीओच्या माध्यमातून ९ हजार कोटी रूपयांचे फ्रेश शेअर्स आणि ३७५ कोटी रूपयांचे शेअर्स नोकरी डॉट कॉमच्या पॅरेंट कंपनी इन्फोएजद्वारे ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी करण्यात आले होते.

कंपनीच्या आयपीओतून मिळालेल्या रकमेचा वापर ऑर्गेनिक आणि इन ऑर्गेनिक ग्रोथ इनिशिएनटिव्ह आणि सामान्य कॉर्पोरेट गरजांसाठी केला जाणार आहे.

झोमॅटोचा आयपीओ ३८.२५ पट अधिक सबस्क्राईब झाला होता. परंतु कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित असलेला हिस्सा पूर्ण सबस्क्राईब झाला नव्हता.

क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी आरक्षित हिस्सा ५१.७९ पट, नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्ससाठी आरक्षित हिस्सा ३२.९६ पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित असलेला हिस्सा ०.६२ टक्के अधिक आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आरक्षित हिस्सा ७.४५ पट अधिक सबस्क्राईब झाला होता.