Zomato IPO : Zomato आणतेय ८२५० कोटींचा IPO; गुंतवणूकदारांसाठी संधी, पाहा काय आहे कंपनीचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 03:32 PM2021-04-28T15:32:58+5:302021-04-28T15:38:01+5:30

Zomato IPO : Zomato लवकरच आपला आयपीओ आणण्याची शक्यता. अनेक जण झोमॅटो आयपीओच्या प्रतीक्षेत आहेत.

जर तुम्ही कोणत्या मोठ्या आयपीओच्या प्रतीक्षेत असात तर लवकरच एक मोठा आयपीओ येण्याच्या तयारीत आहे.

फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोचा आयपीओ प्रायमरी मार्केटमध्ये लवकरच येण्याची शक्यता आहे. झोमॅटोनं आपल्या प्रस्तावित आयपीओसाठी सेबी (SEBI) कडे कागदपत्रे जमा केली आहेत.

झोमॅटोनं जमा केलेल्या कागदपत्रांनुसार कंपनी आयपीओद्वारे ८२५० कोटी रूपये जमवण्याच्या तयारीत आहे.

शेअर बाजारातील अनेक जण झोमॅटोच्या आयपीओच्या प्रतीक्षेत आहे. पाहूया या आयपीओमध्ये काय असेल.

झोमॅटोच्या या आयपीओमध्ये कंपनीकडून फ्रेश इश्यूसोबतच झोमॅटोमध्ये गुंतवणूक असलेल्या Info Edge (India) Limited कडून ऑफर फॉर सेल असेल.

आयपीओमध्ये ७,५०० कोटी रूपयांचा फ्रेश इश्यू आणि इन्फो एजकडून ठेवण्यात येणारा ७५० कोटी रूपयांचा ऑफर फॉर सेल असेल.

झोमॅटो आयपीओमध्ये आपल्या होल्डिंगच्या ७५० कोटी रूपयांच्या शेअरची विक्री OFS द्वारे विकण्यात येणार असल्याचं इन्फो एजनं सांगितलं.

सध्याच्या काळात झोमॅटोमध्ये इन्फो एजचा १९ टक्के हिस्सा आहे.

कंपनीच्या संचालक मंडळानं OFS द्वारे झोमॅटोच्या आयपीओमध्ये ७५० कोटी रूपयांच्या शेअरच्या विक्रीसाठी मंजुरी दिली असल्याचं इन्फो एजनं रेग्युलेटरी फायलिंगमध्ये सांगितलं.

सेबीची मंजुरी मिळाल्यानंतर आयपीओची लाँच डेट ही शेअर मार्केटच्या कामगिरीवर अवलंबून असेल असं म्हटलं जात आहे.

आयपीओतून मिळणारी रक्कम कंपनी आपल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी करेल असं झोमॅटोनं म्हटलं आहे.

याशिवाय कॉर्पोरेट आवश्यकतांसाठीही या रकमेचा वापर केला जाईल.

२०२० मध्ये पूर्ण झालेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल २४८६ कोटी रूपये होता.

परंतु या दरम्यान कंपनीला मोठं नुकसान सोसावं लागलं.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका कंपनीला बसल्याचं सांगण्यात आलं आहे.