Adar Poonawalla: अदार पुनावाला ब्रिटनला का गेले? धमक्यांमुळे की सीरमच्या लसींचा बिझनेस वाढवण्यासाठी...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 10:57 AM2021-05-04T10:57:51+5:302021-05-04T11:25:14+5:30

Adar Poonawalla's Serum Institute To Invest 240 Million Pounds In UK: अदार पुनावाला यांनी गेल्याच महिन्यात ब्रिटनमध्ये सर्वाधिक भाडे देऊन एक अलिशान महाल घेतला होता. यामुळे त्यांची युकेमध्ये व्यवसाय वृद्धी करण्याचे मनसुबे उघड झाले होते. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

देशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आधीच दुसऱ्या टप्प्यातील नागरिकांना लस मिळत नसताना तिसऱ्या टप्प्यातील म्हणजेच 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना लस पुरविण्यावरून केंद्र सरकार आणि कंपन्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. यातच सीरमचे अदार पुनावाला हे धमक्या मिळत असल्याने ब्रिटनमध्ये सहकुटुंब गेले आहेत. अशातच पुनावाला यांनी ब्रिटनमध्ये लसींचा बिझनेस सुरु केल्याने खळबळ उडाली आहे. (Adar Poonawalla's Serum Institute To Invest 240 Million Pounds In UK)

अदार पुनावाला यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. कोरोनाला सरकारने हलक्यात घेतले. यामुळे कोरोनाची दुसरी लाट आल्याचा आरोप पुनावाला यांनी केला आहे.

जानेवारीत जेव्हा रुग्ण कमी झाले तेव्हा सरकारने कोरोनाला हलक्यात घेतले. यामुळे सीरमला लसीच्या ऑर्डर मिळाल्या नाहीत. याचा परिणाम असा झाला की, सीरमने लस बनविण्याची क्षमता वाढविली नाही, असे अदार पुनावाला यांनी म्हटले होते.

दुसरीकडे काही मिडीया रिपोर्टनुसार सरकारने पुरेशी ऑर्डर दिली होती. याच दरम्यान, केंद्र सरकारनेही अदार पुनावालांचे आरोप फेटाळले असून लस बनविण्याची ऑर्डर कंपनीला दिलेली आहे. मात्र, त्यानुसार कंपन्या लस पुरविण्यास असमर्थ ठरल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील लसीची मागणीदेखील कंपन्यांना पूर्ण करता आलेली नाही, असे म्हटले आहे.

केंद्र सरकारने गेल्य़ाच महिन्यात 16 कोटी डोसची मागणी नोंदविली होती. हे डोस येत्या तीन महिन्यांत दिले जाणार आहेत. 28 एप्रिलला सीरमला 11 कोटी आणि भारत बायोटेकला पाच कोटींची ऑर्डर दिली होती. तसेच सीरमला य़ाचे 1732 .5 कोटी रुपये आणि भारत बायोटेकला 787.5 रुपये देण्यात आले आहेत. यामुळे सीरमच्या अदार पुनावालांचा आरोप चुकीचा आहे असे सरकारने म्हटले आहे.

एकीकडे सीरम आणि केंद्र सरकारमध्ये तूतू मैमै सुरु झालेले असताना दुसरीकडे अदार पुनावाला यांनी युकेमध्ये लसींचा व्यवसाय सुरु करण्याचे मन बनविले आहे. ते धमक्यांमुळे ब्रिटनला गेले असले तरी देखील त्यामागचा त्यांचा प्लॅनिंग वेगळाच असल्याचे आता समोर येत आहे.

अदार पुनावालांना बड्या बड्या राजकारण्यांचे, उद्योगपतींचे धमकीचे फोन येऊ लागल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे केंद्र सरकारने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली होती. तरीही पुनावाला यांनी ब्रिटेन गाठल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महत्वाचे म्हणजे पुनावाला यांनी गेल्याच महिन्यात ब्रिटनमध्ये सर्वाधिक भाडे देऊन एक अलिशान महाल घेतला होता. यामुळे त्यांची युकेमध्ये व्यवसाय वृद्धी करण्याचे मनसुबे उघड झाले होते. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

ब्रिटनच्या सरकारने यूके इंडिया ट्रेड डील अंतर्गंत मोठी घोषणा केली आहे. 1 अब्ज पाऊंडच्या या डीलमुळे देशात 6500 हून अधिक नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यांच्यानुसार सीरमने युकेमध्ये लसीच्या व्यवसायासाठी 240 दशलक्ष पाऊंडची गुंतवणूक केली आहे. यानुसार नवीन सेल्स ऑफिस उघडले जाणार आहे.

यामुळे पुनावाला खरेच धमक्यांमुळे ब्रिटनला निघून गेले की आपला व्यवसाय वाढविण्यासाठी, असे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.