बँकांमध्ये एफडी करणे ठरणार तोट्याचे, अधिक लाभ मिळवण्यासाठी आता हे आहेत पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 10:11 PM2020-06-10T22:11:03+5:302020-06-10T22:29:53+5:30

कोरोनाच्या संकटादरम्यान, सरकारी बँकांपासून खासगी बँकापर्यंत सर्वांनी आपल्या ठेवीदारांना धक्का दिला आहे. 

देशात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे लोकांसमोर आरोग्यासोबतच आर्थिक सुरक्षेचा प्रश्नही ऊभा राहिला आहे. त्यातच बँकांनी ग्राहकांना मिळणाऱ्या लाभांना कात्री लावण्यास सुरुवात केली आहे.  गेल्या काही वर्षांत बँकांमधील बचत खाती आणि मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजात बँकांकडून सातत्याने कपात करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटादरम्यान, सरकारी बँकांपासून खासगी बँकापर्यंत सर्वांनी आपल्या ठेवीदारांना धक्का दिला आहे. 

बँकेतील ठेवींवर मिळणाऱ्या परताव्याचा आलेख सातत्याने खाली येत असल्याने ठेवीदारांची परताव्याबाबत निराशा होत आहे. त्याचं कारण म्हणजे अल्पमुदतीच्या ठेवी आणि बचत खात्यामधील रकमेवर जवळपास सारखेच व्याज मिळत आहे. त्यामुळे आता  ठेवीदार बचत खात्यांमध्ये पैसे ठेवत आहेत किंवा अन्य पर्याय निवडत आहेत. 

देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने आपल्याकडील सर्व व्याजदरांना कात्री लावली आहे. त्यामुळे ग्राहकांना धक्का बसला आहे. सध्या एसबीआय बचत खात्यांवर  २.७ टक्के व्याज देत आहे. तर एक वर्षाच्या मुदत ठेवींवर ५.१० टक्के व्याज देत आहे. 

आयसीआयसीआय बँकेचा विचार केल्यास ही बँक बचत खात्यावर ३ टक्के व्याज देत आहे. तर एक वर्षाच्या एफडीवर ५.५० टक्के व्याज देत आहे.  दुसरीकडे एचडीएफसी बँक बचत खात्यावर ३.२५ टक्के तर एक वर्षाच्या एफडीवर ५.६० टक्के व्याज देत आहे. 

पोस्ट खात्याच्या योजनांचा विचार केल्यास पोस्ट खात्यातील बचत खात्यांवर चार टक्के व्याज मिळत आहे. 

मात्र आयडीएफसी बँक याला आपवाद ठरली असून, या बँकेत एक लाख रूपयांपर्यंतच्या ठेवीवर सहा टक्के आणि एक लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर सात टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे. 

मात्र तुम्ही दूरदृष्टीने विचार करत असाल आणि थोडा धोका पत्करायची तयारी असेल तर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा चांगला पर्याय ठरू शकता. देश कोरोनाच्या संकटातून बाहेर पडला की म्युच्युअल फंडांचा ग्राफ उंचावण्याची शक्यता असून, दीर्घकाळासाठी चांगल्या फंडामधून १२ टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतो. 

सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात पीपीएफसह अनेक सरकारी गुंतवणुकीचे पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध आहेत. यामधील तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील, सोबतच परतावासुद्धा बँकेतील बचतीपेक्षा अधिक मिळेल. 

सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात पीपीएफसह अनेक सरकारी गुंतवणुकीचे पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध आहेत. यामधील तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील, सोबतच परतावासुद्धा बँकेतील बचतीपेक्षा अधिक मिळेल.