मुकेश अंबानी बीटी समुहात हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत; परदेशातही Reliance Jio चा दबदबा?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 12:48 PM2021-11-29T12:48:27+5:302021-11-29T12:57:20+5:30

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी युकेमधील टेलिकॉम समुह BT चा हिस्सा खरेदी करण्यासाठी बोली लावण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओ आता परदेशातही पाय रोवण्याच्या तयारीत दिसत आहे.

Mukesh Ambani Reliance Jio : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी (Reliance Jio Mukesh Ambani) हे ब्रिटनमधील टेलिकॉम कंपनी खरेदी करण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) युकेची टेलिकॉम कंपनी ब्रिटीश टेलिकॉम (BT) मध्ये हिस्सा खरेदी करण्यासाठी बोली लावण्याची शक्यता आहे.

मुकेश अंबानी यांचं हे पाऊल जिओला जागतिक बाजारपेठेत नेण्याच्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल म्हमून पाहिलं जात आहे. यूके स्थित बीटी टेलिकॉमच्या ४१९ संस्थात्मक गुंतवणूकदारांपैकी काही योग्य ऑफरसाठी कंपनीतील त्यांचे स्टेक विकू शकतात.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज बीटी कंपनीमध्ये हिस्सा खरेदी करण्याची शक्यता आहे. याशिवाय बीटी ग्रुपकडूनही कंपनीत हिस्सा खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला जाऊ शकतो. यापूर्वी बीटी ग्रुपकडून रणनीतिक हिस्सा विकण्याची योजना रद्द करण्यात आली होती.

दरम्यान कंपनीनं आपल्या योजनांचा विस्तार करण्यासाठी स्वत: निधी उभारणास असल्याचं म्हटलं होतं. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बीटी ग्रुपमध्ये हिस्सा खरेदी करण्याची चर्चा सध्या सुरूवातीच्या टप्प्यात आहे.

BT ब्रिटनच्या सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनी आणि नेटवर्क प्रोव्हायडर्सपैकी एक आहे. ही कंपनी अनेक देशांमध्ये सेवा पुरवत आहे. याशिवाय फिक्स्ड लाईन टेलिकॉम सर्व्हिसही पुरवते. याशिवाय कंपनी फायबर ब्रॉडबॅन्ड, आयपी टीव्ही, टेलिव्हिजन आणि खेळाचं प्रक्षेपण आणि मोबाईल सेवा देत आहे.

मुकेश अंबानी हे दीर्घ काळापासून परदेशात जिओच्या विस्तार करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वीही त्यांनी टी मोबाईलचं (T-Mobile) डच युनिट खरेदी करण्यासाठी बोली लावली होती. परंतु त्यांना यात यश आलं नाही.

परंतु जिओ आपल्या सेवांचा परदेशात विस्तार करू इच्छित आहे. रिलायन्स जिओच्या बीटी समुहात हिस्सा खरेदी करण्याच्या विचाराला जिओच्या विस्ताराच्या रूपात पाहिलं जात आहे.