एअर इंडिया नव्या टेक ऑफच्या तयारीत! टाटा समूहाचा 100 दिवसांचा कृती आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 03:27 PM2021-12-06T15:27:04+5:302021-12-06T15:46:08+5:30

Air India : टाटा समूह जानेवारी २०२२ मध्ये एअर इंडियाची कमान हाती घेण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : टाटा समूहाने एअर इंडिया या विमान कंपनीच्या घरवापसीनंतर आता याच्या कायापालटची तयारी सुरू केली आहे. हे पूर्ण करण्यासाठी टाटा समूहाने 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे.

म्हणजेच, आता 100 दिवसांच्या आत ही एअरलाइन नवीन बदलांसह दिसणार आहे. विशेष म्हणजे, टाटा समूहाने नुकतीच कर्जबाजारी सरकारी विमान कंपनी एअर इंडिया विकत घेतली होती. तसेच, टाटा समूह जानेवारी २०२२ मध्ये एअर इंडियाची कमान हाती घेण्याची शक्यता आहे.

रिपोर्टनुसार, एअर इंडियाचा कायापालट करण्यासाठी 100 दिवसांचा जो कृती आराखडा तयार केला आहे . या तयारीची सुरुवात एअर इंडियाच्या सीईओ पदाचे नाव फायनल करण्यासोबत सुरू झाली आहे. टाटा समूहाने सीईओसाठी सल्लामसलत करण्यास सुरुवात केली आहे.

या अंतर्गत अमेरिकेच्या डेल्टा एअरलाइनचे माजी संचालक फ्रेड रीड यांचे नाव आघाडीवर आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे राहणारे फ्रेड रीड हे नागरी विमान वाहतूक उद्योगातील दिग्गज आहेत.

100 दिवसांच्या कृती आराखडा योजनेंतर्गत एअर इंडियाची ऑन-टाइम परफॉरमेंस कामगिरी सुधारण्यावर तसेच प्रवासी आणि कॉल सेंटरशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यावर भर असेल. विमान कंपनीच्या मुख्य सेवेशी संबंधित मानकांमध्ये सुधारणा करणे हा त्याचा उद्देश आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जानेवारी 2022 पासून टाटाची हिशोबाची पुस्तके दुरुस्त केली जातील, ज्यात उड्डाण दुरुस्ती आणि गुणवत्ता नियंत्रण खर्चासह उड्डाण आणि देखभाल खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार, भत्ते, देयके इत्यादींचा समावेश आहे.

दरम्यान, टाटा समूहाने मात्र या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला. कंपनीने ईमेल केलेल्या उत्तरात म्हटले आहे की, एअर इंडियाचा शेअर खरेदीचा व्यवहार सध्या सुरू आहे.

ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्ही भारत सरकारसोबत जवळून काम करत आहोत. जोपर्यंत करार पूर्ण होत नाही तोपर्यंत, आम्ही विमान कंपनीशी संबंधित कोणत्याही बाबींवर भाष्य करणे टाळू.