Ram Mandir: TATA ग्रुपची ‘ही’ कंपनी पाहणार राम मंदिराचा सगळा हिशोब! ट्रस्टचा निर्णय; पाहा, नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 03:32 PM2021-10-23T15:32:34+5:302021-10-23T15:43:06+5:30

Ram Mandir TCS: TATA ग्रुपमधील एका बड्या कंपनीला राम मंदिराचा हिशोब पाहण्याचे काम देण्याचा निर्णयही एका बैठकीत घेण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या (Ayodhya) विवादावर दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर सर्वांच्याच नजरा आता राम मंदिराकडे लागल्या आहेत. राम मंदिर (Ram Mandir) भाविकांना दर्शनासाठी कधी खुले होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रामजन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्ट निर्धारित वेळेत राम मंदिराचे काम पूर्ण करण्यावर भर देत आहे. राम मंदिर उभारणीतील सुपर स्ट्रक्चरचे काम फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू होईल, अशी महिती देण्यात आली आहे. अलीकडेच झालेल्या एका बैठकीत राम मंदिराच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला.

तसेच आताच्या घडीला TATA ग्रुप अनेकविध क्षेत्रात आघाडीवर असून, टाटा ग्रुपमधील एका बड्या कंपनीला राम मंदिराचा लेखाजोखा पाहण्याचे काम देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. राम मंदिराच्या हिशोबाबाबत अनेक आरोप आणि दावे केले होते. यानंतर काम TATA ग्रुपकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

TATA ग्रुपमधील आघाडीची कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS या कंपनीला राम मंदिराचा हिशोब देण्याचा निर्णय रामजन्मभूमि ट्रस्टने घेतला असून, रामघाट येथे रामजन्मभूमि कार्यशाळेच्या प्रांगणात टीसीएस कंपनीचे अकाऊंट्स डिपार्टमेंट तयार करण्यात आले आहे.

येत्या काही दिवसांमध्ये TCS कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी कामाला सुरुवात करतील, असे सांगितले जात आहे. रामजन्मभूमि ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी याबाबत माहिती दिली. राम मंदिराच्या हिशोबाची सर्व जबाबदारी TCS ला देण्यात आली आहे. भविष्यातील गरज पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे चंपत राय यांनी सांगितले.

TCS ची सिस्टिम संपूर्ण डिजिटल स्वरुपात असणार आहे. त्याचे प्रेझेंटेशनही करून दाखवले आहे. डिसेंबरपर्यंत TCS ची डिजिटल सिस्टिम तयार होईल, असेही चंपत राय म्हणाले. TCS ला पारदर्शी अकाऊंट प्रणाली तयार करण्यास सांगण्यात आले आहे. TCS चे अधिकारी आणि ट्रस्टची अलीकडेच एक महत्त्वाची बैठक पार पडली.

दरम्यान, डिसेंबर २०२३ पासून भाविकांना अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेता येईल. डिसेंबर २०२३ पर्यंतचा कालावधीत निर्धारित केला गेला असून, त्यानुसारच राम मंदिर उभारणीचे काम सुरू आहे. राम मंदिर निर्माणासाठी अनेक आव्हाने येत आहेत. मात्र, त्यावर मार्ग काढत राम मंदिर उभारणीचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले जात आहे.

राम मंदिर बांधताना स्टीलचा वापर केला जात नाहीए. तसेच सिमेंटही कमीत कमी वापरले जात आहे. राम मंदिरासाठी अन्य गोष्टींच्या वापरावर अधिकाधिक भर दिला जात आहे. आपल्या देशात ५०० ते ८०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली मंदिरे आजही मजबुतीने उभी आहेत. त्या मंदिरांचा अभ्यास करूनच राम मंदिर बांधले जात आहे. तशाच प्रकारचे निर्णय घेण्यात आले असून, काम योग्य पद्धतीने सुरू आहे.

राम मंदिराची रचना करताना दुपारी १२ वाजता प्रभू श्रीराम यांच्यावर सूर्याची किरणे पडतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. शास्त्रज्ञ आणि अन्य तज्ज्ञ तशी रचना करण्याचे काम करत आहेत. यासाठी कोणार्क येथील मंदिराचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे आणि तशाच प्रकारचा झडपा तयार करण्यात येणार आहेत.

राम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आल्यानंतर एका दिवसाला लाखो श्रद्धाळू येऊ शकतील. तसेच एका सेकंदाला सात भाविक दर्शन घेऊ शकतील, अशी व्यवस्था केली जात असून, राम नवमीच्या दिवशी सात लाख रामभक्त येथे येऊन दर्शन घेऊ शकतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव आणि राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी व्यक्त केला आहे.